भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा शेवटचा सामना रविवारी (१९ जून) बंगळुरूमध्ये खेळला गेला. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने मालिका २-२ अशी बरोबरीवर सुटली. भारतीय संघाला मालिका जिंकता आली नसली, तरी संघाला आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे खेळाडू नक्कीच मिळाले आहेत. आपण या लेखात अशाच काही महत्वाच्या खेळाडूंवर नजर टाकणार आहोत. जे या मालिकेप्रमाणेच आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी देखील संघासाठी महत्वाचे ठरतील.
पर्यायी सलामीवीर जोडी तयार
टी-२० विश्वचषकात केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) ही सलामीवीर जोडी भारताच्या डावाची सुरुवात करेल. पण त्यांच्यातील एखादा खेळाडू अनुपस्थित असल्यावर इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या युवा सलामीवीरांपैकी कोणीही एक किंवा वेळप्रसंगी हे दोघे भारतीय संघाला नक्कीच चांगली सुरुवात देऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत इशानने सर्वाधिक २०६ धावा केल्या आहेत, तर ऋतुराज गायकवाडने ९६ धावांचे योगदान दिले आहे.
अष्टपैलूची समस्या संपली
मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकातील वाईट प्रदर्शनानंतर हार्दिक पांड्याने काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. विश्रांतीनंतर हार्दिकने आयपीएल २०२२ मध्ये जोरदार पुनरागमन केले आणि त्याच प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात स्थान बनवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार डावांमध्ये त्याने ५८.५० च्या सरासरीने आणि १५३.९५ च्या स्ट्राईक रेटने ११७ धावा केल्या आहेत. हार्दिकने संघात पुनरागमन केल्यामुळे अष्टपैलूची समस्या संपली आहे. वेळप्रसंगी हार्दिक अनुपस्थित असल्यावर वेंकटेश अय्यरला संधी दिली जाऊ शकते.
मिळाला उत्कृष्ट फिनिशर
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने मोठ्या काळानंतर भारतीय संघासाठी फलंदाजी केली आहे. कार्तिकने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळलेल्या चार टी२० सामन्यांमध्ये १५८.६२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. परंतु लक्ष्याला पाठलाग करताना कार्तिक कसे प्रदर्शन करतो, हे पाहावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कार्तिकने ज्या पद्धतीने डावाचा शेवट केला, ते पाहता आगामी टी-२० विश्वचषकासाठी त्याची संघातील जागा पक्की मानली जात आहे.
फॉर्ममध्ये परतला युझवेंद्र चहल
आयपीएल २०२२ मध्ये पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला युझवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. पण नंतर त्याने चांगले पुनरागमन केले. तो या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा संयुक्तपणे दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये सहा विकेट्स नावावर केल्या आहेत. चहल लयीत परतल्यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक खेळताना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
पर्यायी वेगवान गोलंदाज तयार
टी-२० विश्वचषकात जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे त्रिकूट भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी करताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत बुमराह आणि शमी संघात सहभागी नव्हते. पण आवेश खानने या मालिकेत स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. तसेच हर्षल पटेलच्या रूपात मोहम्मद शमीला टक्कर देणारा गोलंदाज समोर आला आहे. अशात भारतीय गोलंदाजी आक्रमाणात हे दोन्ही पर्यायी गोलंदाज नेहमीच उपलब्ध असतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी-२० विश्वचषकात संधी मिळण्यासाठी युवा खेळाडूंचे पारडे ठरतयं जड, रोहित-विराटचं टेंशन वाढणार?
बॅग पॅक करा आणि नव्या दौऱ्यावर निघा, ‘असे’ आहे टीम इंडियाचे पुढच्या ६ महिन्यांचे वेळापत्रक