भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात यजमान संघाने ४८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाचे मालिकेतील आव्हान कायम आहे. भारत दौऱ्यावर आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत २-१ने पुढे आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून देत एक विक्रमही आपल्या नावे केला आहे.
इशान किशन (Ishan Kishan) याने मागील दोन्ही सामन्यात अधिक धावा केल्या होत्या. या सामन्यातही त्याने उत्तम शॉट्स खेळत चौफेर फलंदाजी केली आहे. त्याला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने चांगली साथ दिली आहे. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची विक्रमी भागीदारी केली आहे.
इशान-किशन यांची ही भागीदारी भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची भागीदारी ठरली आहे. याआधी २०१२ला जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सामन्यात गौतम गंभीर-रॉबिन उथप्पा जोडीने नाबाद ७१ धावांची भागीदारी केली होती.
सातत्याने दोन सामन्यात निराशाजनक फलंदाजी करणाऱ्या ऋतुराजची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली आहे. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार मारत ५७ धावा केल्या आहेत. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठरले आहे. इशानने ३५ चेंडूत ५४ धावा केल्या आहेत. त्याने ३१ चेंडूत आंतरराष्ट्रीय टी२०मधील चौथे अर्धशतक झळकावले आहे.
भारताकडून २३ वर्षाच्या फलंदाजाने टी२०मध्ये चार वेळा ५० किंवा अधिक धावा करण्याचा पराक्रम विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांनी केला आहे. आता या विक्रमात इशानचाही समावेश झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इशान चागंलाच लयीमध्ये दिसत आहे. त्याचे हे मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरले आहे. दिल्लीच्या सामन्यात त्याने ७६ धावा, कटकमध्ये ३४ धावा आणि विशाखापट्टणममध्ये ५४ धावांची खेळी केली आहे. त्याने आतापर्यंत १३ आंतरराष्ट्रीय टी२० ३७.७५च्या सरासरीने ४५३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या चार अर्धशतकांचा समावेश असून ८९ ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
तिसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजीबरोबरच उजव्या हाताच्या गोलंदाजांनीही कमाल केली आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलला मागील दोन सामन्यात एकच विकेट मिळाली होती. या सामन्यात त्याने ड्वेन प्रिटोरियस, रस्सी व्हॅन डर डुसेन आणि हेन्रिच क्लासेन या तीन प्रमुख फलंदाजांना बाद करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने चार विकेट्स घेत भारताचे मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी२० सामना १७ जूनला राजकोट येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिले पाढे पंचावन्न! कटकमध्ये पंतची जी चूक झाली, तिच विशाखापट्टणमध्येही झाली, पाहा व्हिडिओ
INDvsSA T20: मालिकेत पुनरागमनाचे श्रेय ‘कॅप्टन’ रिषभ पंतने दिले ‘या’ खेळाडूंना