भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या टी२० मालिकेत भारतीय संघाने सलग दोन सामने जिंकत २-२ अशी बरोबरी साधली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी ही मालिका उपयोगी ठरणार आहे. या मालिकेत जो भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करेल त्याची विश्वचषक स्पर्धेत वर्णी लागणार आहे अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनी दिनेश कार्तिकच्या कामगिरीवर विधान करत त्याची विश्वचषकात संधी मिळण्याच्या आशेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
कार्तिकने राजकोट येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात (१७ जून) अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. नुकतेच गौतम गंभीरने त्याची टी२० विश्वचषक २०२२च्या स्पर्धेत संघात निवड होणार नाही असे विधान केले होते.
गंभीरने कार्तिकला अंतिम अकरामध्ये संघात घेतले नाही तर त्याची संघात निवड करण्याची आवश्यकता नाही असे मत व्यक्त केले होते. त्याच्या या विधानावर भारताचे दिग्गज सुनिल गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कार्तिकने भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी त्याची क्रिकेट कारकिर्द संपली असे म्हटले जात होते. गावसकर यांनी खेळाडूंची निवड ही नाव, प्रतिष्ठा नाही तर त्याची कामगिरी पाहुन केली जाते असे म्हणत गंभीरच्या विधानाला आव्हान दिले आहे. कार्तिकने तीन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने चौथ्या सामन्यात २७ चेंडूत ५५ धावा करत टिकाकरांचे तोंड बंद केले आहे.
गावसकर हे कार्तिकच्या आंतरराष्ट्रीय टी२० मधील अर्धशतकानंतर स्टार स्पोर्टशी बोलत होते. “कार्तिक फलंदाजीसाठी सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर येतो त्यामुळे त्याला कमी चेंडू खेळायला मिळतात. तेव्हा त्याच्याकडून ५० पेक्षा अधिक धावांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. तो २० चेंडूत ४० धावा करून देईल, मात्र नेहमीच सर्वाधिक धावा त्याने केल्या पाहिजे असा विचार करणे योग्य नाही,” असे गावसकर म्हणाले.
या सामन्यात भारताचे पहिले चार खेळाडू लवकर बाद झाल्यावर कार्तिकने चौथ्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या साथीने तुफानी फलंदाजी करत संघाची धावसंख्या १५०च्या वर पोहण्यात विशेष कामगिरी केली आहे. पांड्याने ३१ चेंडूत ४६ धावा केल्या.
“एखाद्या खेळाडूला अंतिम अकरामध्ये खेळायला मिळणार नाही तर त्याला संघात का निवडले जाईल अशी चर्चा काही लोक करत आहेत. याकडे लक्ष न देता तो खेळाडू संघासाठी एक महत्वाचा पर्याय आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे,” असे गावसकर पुढे म्हणाले आहेत.
कार्तिकने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना अनेक सामन्यात फिनीशरची भुमिका निभावली आहेत. त्यावेळी त्याने संघाला अनेक सामन्यात विजयही मिळवून दिला आहे. हीच लय भारतीय संघासोबत कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे असे मतही त्याने मांडत विश्वचषकात खेळण्याची इच्छा दर्शवली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर भारत शेवटच्या सामन्यात टॉस जिंकणार!, रिषभ पंतने लढवणार शक्कल
VIDEO। मुंबईचा पठ्ठ्या टी२० ब्लास्टमध्ये घालतोय राडा!, लगावले सलग ४ चेंडुत ४ षटकार
कार्तिकचं पुनरागमन ‘या’ खेळाडूंसाठी ठरणार धोक्याची घंटा