दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारत दौऱ्याची दमदार सुरूवात केली आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात असून त्यातील चौथा सामना शुक्रवारी (१७ जून) खेळला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुरू होणारा हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत पाहुणा संघ २-१ने पुढे आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने चमकदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाची मालिका खंडीत केली आहे.
या मालिकेत भारताच्या सलामीवीरांना फलंदाजीत लय सापडली आहे ही विशेष बाब आहे, मात्र मधल्या फळीची फलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच भारताचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh PanT) याच्या फलंदाजीचा फॉर्म हरवला आहे. तो सलग तीन सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला आहे. खराब शॉट निवडत त्याने आपली विकेट गमावली आहे. बाकीचे खेळाडू उत्तम खेळ करत असून दुसरीकडे पंतच्या कामगिरीबाबत निराशा व्यक्त केली जात आहे. पहिले दोन सामने गमावल्यावर त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. तिसऱ्या सामन्यात त्याने कर्णधारपदाची योग्य जबाबदारी पार पाडत टीकाकरांना चोख उत्तर दिले आहे. असे फलंदाजीतही घडावे ही आशा आहे.
पंतची सध्या कामगिरी वाईट असली तरीही तो जोरदार पुनरागमन करत टीकाकरांचे तोंड बंद करण्याची ताकद त्याच्यात आहे. त्याचा प्रत्यय अनेकवेळा चाहत्यांना आला आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत आखूड चेंडूचा सामना करताना अडखळला आहे. त्याने तीन सामन्यात ९० धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्याने दोन सामन्यात फलंदाजीत चुणूक दाखवली आहे. त्याने तीन सामन्यात ७१ धावा केल्या आहेत.
भारताच्या सलामीजोडी इशान किशन-ऋतुराज गायकवाड (Ishan Kishan-Ruturaj Gaikwad) यांनी विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात ९७ धावांची खेळी केली. इशानची बॅट पहिल्या सामन्यापासूनच तळपली आहे. या सामन्यात ऋतुराजने त्याला योग्य साथ देत संघाचा धावफलक हलता ठेवला. भारताने २० षटकात ५ विकेट्स गमावत १७९ धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली.
मालिका २-२ अशी बरोबरीत आणण्यासाठी भारताचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. भारत हा सामना जिंकला तर बंगळुरू येथे होणारा पाचवा टी२० सामना मालिकेचा निकाल ठरवेल. चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी डोकेदुखी ठरू शकते. यामुळे पुन्हा एकदा भुवनेश्वरला पॉवरप्लेमध्ये फलंदाजांना धावा करण्यापासून वंचित करावे लागेल. चौथ्या सामन्यात भारत सातत्य राखणार की दक्षिण आफ्रिका पुन्हा भारताला पराभूत करत मालिका खिशात टाकणार हे पाहण्याजोगे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs SA: भारतासाठी ‘करो या मरो!’, महत्त्वाच्या सामन्यात कशी असू शकते दोन्ही संघाची ‘प्लेइंग ११’
भारत की दक्षिण आफ्रिका, आज कोणाच नाणं खणकणार? पाहा काय सांगते सामन्याची खेळपट्टी
भारत मालिका गमावणार? दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू चौथ्या टी२०मध्ये करू शकतो दमदार पुनरागमन