भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेली ५ सामन्यांची टी२० मालिका रोमांचक स्थितीत आहे. उभय संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकल्याने सध्या मालिका २-२ ने बरोबरीत आहेत. अशात आता रविवारी (१९ जून) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा पाचवा आणि शेवटचा टी२० सामना निर्णायक असेल. हा सामना जिंकणारा संघ ३-२ च्या फरकाने मालिकाही खिशात घालेल. अशात या सामन्यात कोणाचे पारडे जड असेल? आणि दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?, ते पाहूया..
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघातील हा २०वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना (IND vs SA T20I Records) असेल. आतापर्यंत झालेल्या १९ टी२० सामन्यांपैकी ११ सामने यजमान भारतीय संघाने जिंकले आहेत. तर पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाच्या नशीबी ८ विजय आले आहेत. दोन्ही संघातील शेवटच्या ५ सामन्यांमधील आकडेवारी नजर टाकायची झाल्यास, त्यातही भारताचेच पारडे जड राहिले आहे. भारतीय संघाने शेवटच्या ५ पैकी ३ सामन्यांमध्ये विजयश्री मिळवली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने २ सामने जिंकले आहेत.
तसेच भारतात भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत ८ टी२० सामने खेळले आहेत. भारतात झालेल्या सामन्यांमध्ये मात्र दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतात भारताला ५ सामन्यांमध्ये धूळ चारली आहे. तर भारतीय संघ केवळ ३ सामन्यांमध्ये विजयी होऊ शकला आहे.
बेंगलोरच्या स्टेडियमवर कसे आहेत दोन्ही आकडे?
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत ५ टी२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी सर्वाधिक ५ सामने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तर ३ सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवता आला आहे. हे मैदान लांबीला छोटे असल्याने येथे फलंदाजांना गोलंदाजांची धुलाई करण्याची संधी असते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५४ राहिली आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १४३ राहिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेने या मैदानावर मात्र एकच सामना खेळला आहे. २०१९ मध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ९ विकेट्सने पराभूत केले होते.
भारत-दक्षिण आफ्रिकेकडे इतिहास रचण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांकडे पाचव्या टी२० सामन्यात इतिहास रचण्याची संधी असेल. वर्ष २०१९ पासून भारतीय संघाने भारतभूमीत एकही द्विपक्षीय टी२० मालिका गमावलेली नाही. तर दक्षिण आफ्रिकेचा संघही २०११ पासून भारतात एकही मालिका गमावलेली नाही. अशात आता पाचवा टी२० सामना जिंकत ही दोन्ही संघ ही अपराजित राहण्याची मालिका तोडण्यावर लक्ष केंद्रित करतील.
संभाव्य संघ-
दक्षिण आफ्रिका-
टेम्बा बावुमा (कर्णधार)/ रीझा हेन्ड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेविड मिलर, हेन्रिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जेन्सन/कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी, एन्रिच नॉर्किया
भारत-
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvSA । मालिकेच्या निर्णायक सामन्याची खेळपट्टी कशी असेल?, वाचा एका क्लिकवर