भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज (8 नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 पासून खेळला जाईल. नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच 8 वाजता होईल.
भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती आहे, जो या सामन्यात मजबूत प्लेइंग 11 सह मैदानात उतरू शकतो. अभिषेक शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सलामीची जबाबदारी सांभाळतील. मधल्या फळीत कर्णधार सूर्याशिवाय तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, रमणदीप सिंग जबाबदारी सांभाळू शकतात. यानंतर गोलंदाजीची कमान अक्षर पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे दिली जाऊ शकते.
या सामन्याद्वारे उभय संघांचे दोन खेळाडू पदार्पण करू शकतात. रमणदीप सिंग हा भारतीय अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला संधी मिळाल्यास त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमही अष्टपैलू खेळाडू अँडिले सिमेलेनला पदार्पण करण्याची संधी देऊ शकतो.
या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात अनेक नवीन आणि तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मधल्या फळीतील फलंदाज रमणदीप सिंग आणि वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाख यांना संधी मिळाली. या दोन्ही खेळाडूंना प्रथमच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळालं आहे. याशिवाय डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे दुखापतीमुळे संघात नाहीत. अष्टपैलू रियान परागही निवडीसाठी उपलब्ध नाही.
पहिल्या टी20 साठी संभाव्य संघ
भारत – संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिका – रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन/गेराल्ड कोएत्झी, अँडिले सिमेलेन, नकाबा पीटर, केशव महाराज आणि ओटनील बार्टमन
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतापुढे झुकला पाकिस्तान, भारताच्या सामन्यांचे ठिकाण बदलणार?
‘हे’ 3 विस्फोटक फलंदाज मोडू शकतात ब्रायन लाराचा 400 धावांचा विश्वविक्रम?
VIDEO; ‘या’ महान क्रिकेटपटू पुढे झुकला होता विराट कोहली, स्वत:च सांगितला किस्सा