Kagiso Rabada 500 Wickets: सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने कहर केला. त्याने आपल्या घातक वेगाच्या जोरावर भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. रबाडाने भारताच्या 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रबाडाने अवघ्या 28 वर्षांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम केला. चला तर, त्याचा विक्रम जाणून घेऊयात…
कागिसो रबाडा 500 विकेट्स
कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने भारतीय संघाच्या पाच फलंदाजांची विकेट घेतली. त्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता. रबाडाने रोहित, विराट आणि श्रेयसची विकेट घेत भारतीय फलंदाजी उद्ध्वस्त करून टाकली.
पाच विकेट्स घेताच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रबाडाने 500 विकेट्सचा टप्पा पार केला. तो दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा सातवा गोलंदाज बनला आहे. त्याने ही कामगिरी अवघ्या 28व्या वर्षी करून दाखवली. रबाडाने 17 षटकांच्या स्पेलमध्ये 44 धावा खर्चत 5 विकेट्स नावावर केल्या. विशेष म्हणजे, रबाडाने भारताविरुद्ध कसोटीत पहिल्यांदाच विकेट्सचे पंचक पूर्ण केले.
कशा काढल्या विकेट्स?
रबाडाने आपल्या वेगाने भारताची फलंदाजी फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. त्याचा पहिला शिकार कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बनला. त्याला रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी 13व्यांदा तंबूत पाठवले. यानंतर त्याने श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्यात बनत असलेली भागीदारीही मोडून टाकली.
रबाडाने आधी अय्यरला आणि नंतर विराटला तंबूत धाडले. रबाडा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या स्पेलमध्ये आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांच्याही विकेट्स घेतल्या.
रबाडाचा पराक्रम
कागिसो रबाडाने कसोटीच्या एका डावात 14व्यांदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला. रबाडाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहिली, तर त्याने आतापर्यंत 61 सामन्यात 285 विकेट्स घेतल्या आहेत. रबाडाच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स या फक्त मिचेल स्टार्क याने घेतल्या आहेत. (ind vs sa pacer kagiso rabada completes 500 hundred international wickets took 5 wickets haul for 1st time against team india)
हेही वाचा-
केएलचा क्लास पाहून भलतेच खुश झाले इरफान पठाण अन् गावसकर; म्हणाले, ‘या 70 धावा शतकापेक्षाही…’
‘तो त्याचा शॉट आहे…’, पुल शॉट खेळून 5 धावांवर बाद झालेल्या रोहितला मिळाला बॅटिंग कोचचा भक्कम पाठिंबा