भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला उद्यापासून रांचीमध्ये सुरुवात होत आहे. कसोटी मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर भारत आता पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
शुभमन गिल दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्यानं नेतृत्वाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राहुलनं स्पष्ट केलं की तो या मालिकेत सहाव्या क्रमांकावरच फलंदाजी करणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्येही त्याने हाच क्रमांक सांभाळला होता.
कसोटीत सलामीला उतरणारा राहुल, वनडेत मात्र मधल्या फळीत अधिक स्थिरावला आहे. सहाव्या क्रमांकावर त्याची सरासरी 40 पेक्षा जास्त असली तरी, अद्याप तो या क्रमांकावरून अर्धशतक किंवा शतक झळकवू शकलेला नाही. फिरकी गोलंदाजीला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी संघ सज्ज असल्याचंही राहुलनं स्पष्ट केलं.
दरम्यान, रोहित शर्मासोबत भारतीय डावाची सुरुवात कोण करणार हा मोठा प्रश्न कायम आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वालला सलामीची संधी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने चौथ्या क्रमांकावर रिषभ पंत दिसू शकतो. ऋतुराज गायकवाडला संधी मिळाल्यास तो पाचव्या क्रमांकावर खेळेल.
ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनाही संधी मिळण्याची चिन्हे आहेत. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांची जोडी दिसू शकते. तर मुख्य फिरकी गोलंदाजाची जबाबदारी कुलदीप यादवकडे असेल.
भारताच्या वनडे संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार), रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे.
वनडे मालिकेत भारत कोणत्या संयोजनासह उतरतो आणि कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड करू शकतो का, हे पाहण्यासाठी चाहत्यांची नजर रांचीवर खिळून राहणार आहे.






