भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिकेचा चौथा सामना राजकोटमध्ये खेळला गेला. भारताच्या फलंदाजी क्रमातील पहिले चार फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले, पण हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांनी पुन्हा एकदा चांगल्या फिनिशरची भूमिका चोख पार पाडली. कार्तिकने त्याच्या टी२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) भारतीय संघाचा एक अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आहे. परंतु आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याने अद्याप एकही अर्धशतक केले नव्हते. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात कार्तिकला टी२० मध्ये पहिले अर्धशतक कऱ्यासाठी योग आला. त्याने या सामन्यात अवघ्या २७ चेंडूत ५५ धावा केल्या. यामध्ये ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या धावा त्याने २०३.७० च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.
कार्तिकच्या टी२० आंतरराष्ट्रीयमधील प्रदर्शनाचा एकंदरीत विचार केला, तर त्याने आतापर्यंत ३६ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ४९१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १४६.१३ आणि सरासरी ३५.०७ राहिली आहे. टी२० क्रिकेटमध्ये कार्तिकने आतापर्यंत एकूण ५३ चौकार आणि १९ षटकार ठोकले आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात कार्तिकने केलेले अर्धशतक जितके महत्वाचे होते, तितक्याच महत्वाच्या होत्या हार्दिक पंड्याने केलेल्या ४६ धावा. या धावा करण्यासाठी हार्दिकने ३१ चेंडू खेळले आणि यामध्ये ३ षटकारांसह तीन चौकार देखील मारले. भारतीय संघाने अवघ्या ४० धावांवर त्यांच्या सुरुवातीच्या तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण हार्दिक आणि कार्तिक या दोघांनी शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या ताबडतोड फलंदाजीमुळे भारतीय संघ १६९ धावा करू शकला.
सामन्यात भारताच्या ६ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. सलामीवीर फलंदाज इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या सामन्यात अनुक्रमे २७ आणि ५ धावा करून बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावरील श्रेयस अय्यर ४, तर कर्णधार रिषभ पंतने १७ धावा करून विकेट गमावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सिक्स आणि बॉल गायब! इंग्लंडच्या फलंदाजाच्या जबरदस्त षटकाराचा परिणाम एकदा बघाच
‘सध्या त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे!’, नेहराजींनी रिषभ पंतला फटकारले
इंग्लंडचा गड राखण्यासाठी भारतीय ‘शिलेदार’ तयार; सरावाला केली सुरूवात





