गुरुवारी (२४ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात (India vs Sri Lanka T20 Series) भारतीय संघाने ६२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासाठी भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये महत्वाचे योगदान दिले. परंतु, क्षेत्ररक्षणावेळी भारतीय संघातील काही खेळाडूंनी महत्वाचे झेल सोडले. याच कारणास्तव कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाराजी व्यक्त केली आहे. पण याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) या सामन्यात सामनावीर ठरला आणि यासाठी रोहितने त्याचे कौतुकही केले.
श्रीलंकेच्या फलंदाजीवेळी भारतीय खेळाडूंनी अनेक सोपे आणि महत्त्वाचे झेल सोडले, त्यामुळे रोहित शर्मा निराश आहे. आगामी विश्वचषकापूर्वी रोहित संघातील सर्व कमतरता दूर करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. सामना संपल्यानंतर त्याने संघाच्या क्षेत्ररक्षणावर मोठी प्रतिक्रिया दिली.
तो म्हणाला की, “हे आता सतत होत आहे. आम्ही सोपे झेल सोडत आहोत. या टप्प्यावर अशी अपेक्षा नसते. आमच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांना अजून खूप काम करायचे आहे. आम्हाला आमच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल आणि यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी एक उत्तम क्षेत्ररक्षकांचा संघ तयार करायचा आहे. आता अशाप्रकारच्या चुकांना जागा नसेल.”
ईशान किशनने या सामन्यात ५६ चेंडूत ८९ धावा केल्या आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. ईशान किशनसाठी टी-२० आंतरराष्ट्रीयमधील ही सर्वोत्तम खेळी आहे. रोहित आणि ईशानने १११ धावांची महत्वाची भागीदारी पार पाडली.
याविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “मी ईशानला खूप दिवसांपासून ओळखतो. आम्ही दोघे एकच फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. मला त्याची मानसिकता आणि क्षमता माहिती आहे. ईशासाठी फॉर्म मिळवणे गरजेचे होते. दुसऱ्या बाजूने त्याला फलंदाजी करताना पाहून चांगले वाटले. त्याने सहा षटकांनंतर स्वतःची खेळी चांगल्या प्रकारे सावरली, जे साधारणतः त्याच्यासाठी आव्हान असते. कारण आपल्याला माहिती आहे, त्याला स्वतःचे शॉट खेळायला आवडतात.”
दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात २ विकेट्सच्या नुकसानावर १९९ धावा केल्या. यामध्ये ईशान किशन व्यतिरिक्त रोहित शर्मा (४४) आणि श्रेयस अय्यर (५७) यांचेही महत्वाचे योगदान राहिले. त्यानंतर प्रत्युत्तरात श्रीलंका संघ २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १३७ धावांपर्यंत पोहोचू शकला. परिणामी भारताने ६२ धावा राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.





