भारत आणि श्रीलंकेतील (IND vs SL T20 series) दुसरा टी-२० सामना शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशालामध्ये खेळला गेला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. याबरोबरच रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने त्यांची सलग तिसरी टी-२० मालिका जिंकला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले, पण तरीही रोहित गोलंदाजांच्या प्रदर्शनावर नाखुश आहे. विजयानंतर त्याने गोलंदाजांच्या प्रदर्शनाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५ विकेट्सच्या नुकसानावर १८३ धावा केल्या. भारताने १८४ धावांचे लक्ष्य तीन विकेट्सच्या नुकसानावर आणि १७.१ षटकात गाठले. श्रीलंका संघ एवढ्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकलाच नसता, परंतु भारतीय गोलंदाजांनी अंतिम पाच षटकांमध्ये तब्बल ८० धावा खर्च केल्या. याच कारणास्तव भारताला विजयासाठी मोठे लक्ष्य मिळाले.
सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “आम्ही गोलंदाजांवर जास्त सक्ती दाखऊ इच्छित नाही. आम्ही पहिल्या १५ षटकांपर्यंत त्यांना (श्रीलंकन फलंदाज) रोखण्यात यश मिळवले होते, पण मैदान असे होते की, प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर जायचा. असे असले तरी, आम्ही शेवटच्या पाच षटकांमध्ये ८० धावा खर्च केल्या. ही अशी गोष्ट आहे, ज्यावर आम्हाला काम करण्याची गरज आहे.”
“पहिल्या १५ षटकांमध्ये चांगले काम केले. खेळपट्टी अप्रतिम होती, चेंडू चांगल्या पद्धतीने येत होता आणि अशा गोष्टी होत असतात. संघात असे काही खेळाडू आहे, ज्यांना फक्त संधी हवी आहे आणि ते चांगले प्रदर्शन करू इच्छितात. आम्हाला माहिती आहे की, त्यांच्यात अशी ताकत आहे, जी त्यांना संधी मिळताच सिद्ध करायची आहे.”
दरम्यान, दुसऱ्या टी२० सामन्यातील भारतीय संघाच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन अपयशी ठरले. सलामीवीरांनी स्वस्तात विकेट गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने भारताचा डाव सांभाळला. श्रेयसने सर्वाधिक ७४ धावा केल्या आणि सामनावीर ठरला. त्यानंतर संजू सॅमसनने ३९ आणि रवींद्र जडेजाने ४५ धावांचे मोलाचे योगदान देत संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत आणि २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) धरमशालामध्ये खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
मस्ती टाईम! सिराज, कुलदीपने भर सामन्यात केली पंचांची नक्कल, मस्करी करतानाचा व्हिडिओ व्हायरल