भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20I Series) यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय संघ (Team India) ७ विकेट्स राखून विजयी ठरला आहे. श्रीलंकेने दिलेले १८४ धावांचे लक्ष्य श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने सहज गाठले. या विजयानंतर भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विजयासोबतच अनेक विक्रमांची नोंदही केली आहे.
भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील हा सलग दुसरा विजय आहे, तर आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सलग ११ वा विजय आहे. सर्वात जास्त सलग आंतरराष्ट्रीय टी-२० विजय मिळवण्याच्या बाबतील भारतीय संघ पहिल्या पाचमध्ये सहभागी झाला आहे.
या यादीत अफगाणिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, ज्यांनी लागोपाठ १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोमानिया आहे, त्यांनी देखील १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग विजय मिळवला आहे आणि हे सत्र पुढेही चालूच आहे. अफगाणिस्तान युगांडा आणि भारत या देशांनी प्रत्येकी ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग विजय मिळवला आहे आणि हे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. भारतीय संघाकडे विजयाचे हे सत्र पुढे कायम ठेवण्याची संधी आहे.
भारतीय संघाची न्यूझीलंडशी बरोबरी
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा संघ बनला आहे. भारत आणि न्यूझीलंड या यादीत बरोबरीवर आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी ३९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने मायदेशात जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिका या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी ३७ टी-२० सामने मायदेशात जिंकले आहेत.
त्याव्यतिरिक्त भारतीय संघाने मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यांमध्येही मोठा विक्रम केला आहे. मायदेशातील मागच्या १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केला, तर भारताने त्या १० पैकी १० सामने जिंकले आहेत. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मायदेशातील टी-२० सामन्यांमध्ये संघाने सलग १० सामने जिंकले आहेत.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या टी-२० सामन्याचा विचार केला, तर भारताला विजयासाठी १८४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य भारतीय फलंदाजांनी १७.१ षटकात गाठले. यामध्ये श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७४ धावा ठोकल्या आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. त्याव्यतिरिक्त संजू सॅमसनने ३९ तर रवींद्र जडेजाने ४५ धावांचे महत्वाचे योगदान दिले. सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन स्वस्तात बाद झाल्यानंतर या तिघांनीच संघाचा डाव सांभाळला.
महत्वाच्या बातम्या –
इशान किशन डोक्याला चेंडू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, ‘अशी’ घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना
‘हिटमॅन’ला १ धावेवर बाद करताच दुष्मंता चमीराच्या नावावर खास विक्रम; बोल्ट अन् साऊदीलाही पछाडलं






