भारताची वेस्ट इंडिज दौऱ्याची (WIvsIND) सुरूवात चांगली झाली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत ३-०असे पराभूत केले आहे. तर शुक्रवारपासून (२९ जुलै) सुरू होणाऱ्या टी२० मालिकेत भारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ही मालिका टी२० विश्वचषकाची पूर्वतयारी असून भारत जवळपास १६ टी२० सामने खेळणार आहेत.
टी२० विश्वचषकापूर्वी भारत खेळणार या टी२० मालिका
ऑस्ट्रेलियात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकाआधी (2022 T20 World Cup) भारत वेस्ट इंडिज विरुद्ध ५ आणि एशिया कपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला तर ५ टी२० सामने खेळणार आहे. एशिया कप ऑगस्टमध्ये खेळला जाणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी ३-३ सामने खेळणार आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेसाठी अनेक खेळाडू परतले आहेत. टी२० विश्वचषकासाठी आता ३ महिने शिल्लक राहिले असताना बोर्डने संघाने अधिकाधिक टी२० सामने खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. तर नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हे विश्वचषकासाठी संघबांधणीची योग्य ती काळजी घेत आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचे फलंदाजीतील पर्याय
रोहित बरोबरच रिषभ पंत, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात परतले आहेत. यामुळे संघाची फलंदाजी अजून तगडी झाली आहे. त्याचबरोबर टी२० प्रकारामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चमकदार खेळी करत आहे. हे पाच जण यजमान संघासाठी धोक्याचे ठरतील. या दौऱ्याआधी भारताने इंग्लंडमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिका जिकंल्या आहेत. त्यामध्ये तर विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघाल्या नसल्या तरी बाकी खेळाडूंनी त्याची कमतरता भासू दिली नाही. सध्या त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून विश्रांती दिली आहे.
तिसऱ्या क्रमांकाची चिंता मिटली-
या दौऱ्यात दीपक हुड्डा (Deepak Hooda) याचाही संघात समावेश आहे. त्याने आतापर्यंत जेवढे टी२० सामने खेळले आहेत त्यातून त्याची कामगिरी उत्तम होत चालली आहे. त्याने आयर्लंड दौऱ्यात शतक झळकावले होते, तर इंग्लंड विरुद्ध पहिल्या आणि एकमात्र टी२० सामना खेळताना चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना १७ चेंडूत ३३ धावा केल्या होत्या. मात्र कोहली संघात परतल्याने त्याला बाकावर बसावे लागले होते. यामुळे भारतीय संघाला आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी दोन पर्याय मिळाले आहेत.
जडेजाच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह
अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली जात आहे. तो दुखापतीमुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिन्ही वनडे सामन्यात खेळला नाही, तर टी२० मालिकेसाठी त्याचा संघात समावेश असून तो खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. तसेच कुलदीप यादव आणि रवि बिश्नोई यांचे संघात पुनरागमन झाले आहे. पंड्याही गोलंदाजीत परतला असून भारतीय संघनिवड अधिकाऱ्यांची चिंता मिटली आहे. तसेच वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने टी२० मालिकेत चांगली कामगिरी केली तर दीपक चाहरवर दबाव वाढणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Commonwealth Games | भारताने नेहमीच दिलीये ऑस्ट्रेलियाला टक्कर, जाणून घ्या टी-२० रेकॉर्ड्स
पहिल्या टी२० सामन्यात कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?, अशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११
VIDEO | कॅरेबियन गोलंदाजाने दाखवून दिली गुणवत्ता, जबरदस्त चेंडूवर घेतली महत्वाची विकेट