भारताचा महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाचा कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभाग घेत आहे. कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या २२ व्या हंगामात पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघापुढे बलाढ्य ऑस्ट्रेलियचे आव्हान असेल. उभय संघातील हा सामना शुक्रवारी (२९ जुलै) खेळला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील यापूर्वीची आकडेवारी पाहिली तर, दोन्ही संघांनी एकमेकांना कडवे आव्हान दिले आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळले जाणारे क्रिकेट सामने हे टी-२० प्रकारातील असतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यापूर्वी एकूण २३ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी १६ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली असून भारताने ६ सामने जिंकले आहेत. उभय संघातील एक सामना निकाली नघू शकला नव्हता.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या मागच्या ५ टी-२० सामन्यांचा विचार केला, तर त्यापैकी ४ सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलिया संघ फक्त एका सामन्यात पराभूत झाला आहे. या पाच सामन्यांमध्ये मार्च २०२० मध्ये खेळला गेलेला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना देखील आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतचा संपूर्ण संघ ९९ धावा करून सर्वबाद झाला होता.
राहिलेल्या चार सामन्यांमपैकी तीन सामने ऑस्ट्रेलियाने ११ धावा, १४ धावा, आणि ४ विकेट्स अशा अंतराने जिंकले होते. टी-२० विश्वचषाकाच्या लीग फेरीत खेळला गेलेल्या एका सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी धूळ चारली आहे. उभय संघातील या मागच्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तर दोन्ही संघात चांगलीच स्पर्धा पाहिली गेली आहे.
कॉमनवेल्थ गेम्सच्या चालू हंगामावर नजर टाकली तर, एकूण ८ क्रिकेट संघ यामध्ये सहभाग घेणार आहेत. या संघांना दोन ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांसोबत ‘ग्रुप ए’ मध्ये बारबाडोस आणि पाकिस्तान संघाचा समावेश आहे. भारतीय संघ ३१ जुलै रोजी पाकिस्तान आणि ३ ऑगस्टला बारबाडोस संघाशी भिडेल. ‘ग्रुप बी’चा विचार केला, तर यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांचा समावेश आहे. दोन्ही ग्रुपमधील पहिल्या दोन स्थानावर जे संघ असतील, त्यांना सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. ७ ऑगस्टला सुवर्ण आहे कांस्य पदाकासाठी सामने खेळले जातील.
यापूर्वी १९९८ साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश केला गेला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया पुरुष संघांमध्ये अंतिम सामना खेळला गेला होता, जो आफ्रिकी संघा जिंकला होता. तसेच न्यूझीलंडने कांस्य पदक जिंकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
यंदा टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज सज्ज! सामन्याचा लावलाय तडाखा, असे असेल वेळापत्रक
एकाचा खराब फॉर्म अन् दुसऱ्याला कोरोना झाल्याने संघात घेतलेला प्रभत चांगलाच गाजतोय! पाहा नवीन पराक्रम






