---Advertisement---

झहीर खानला सीएसकेमध्ये मिळाली मोठी ताकद! आयपीएल 2027 साठी आता स्वतःची ‘टीम’ निवडणार?

On: मंगळवार, सप्टेंबर 22, 2026 9:15 AM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2027च्या आधी एक महत्त्वाचे पाऊल उचलत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल 2026 नंतर स्टीफन फ्लेमिंग यांनी सीएसकेची (CSK) साथ सोडली होती. त्यानंतर ते इंग्लंड संघाचे कसोटी प्रशिक्षक बनले. चेन्नई सुपर किंग्ज नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात होते आणि ही जबाबदारी अनुभवी झहीर खान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघात सामील होताच त्यांनी ही मोठी जबाबदारी स्वीकारली आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर, झहीर खान यांना स्वतःचा कोचिंग संघ तयार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. व्यवस्थापन त्यांच्यावर आधीच ठरवलेला स्टाफ लादणार नाही. त्यांना स्वतःचा सपोर्ट स्टाफ निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. वृत्तानुसार, देशांतर्गत प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम आणि राजीव कुमार संघासोबत राहण्याची शक्यता आहे, तर नवीन फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच, फ्रँचायझी कोचिंग स्टाफमध्ये सामील होण्यासाठी परदेशी उमेदवाराचा, विशेषतः फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी, सक्रियपणे शोध घेत आहे.

मायकल हसी सध्या चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत, परंतु स्टीफन फ्लेमिंग यांच्या जाण्यानंतर ते संघासोबत राहण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी फ्लेमिंग यांच्यासोबत इंग्लंडच्या कसोटी कोचिंग स्टाफमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एरिक सिमन्स हे सीएसकेचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. ते देखील संघाची साथ सोडण्याची शक्यता आहे. आयपीएल 2027 सुरू होण्यापूर्वी बराच वेळ शिल्लक असल्याने, झहीर खान यांच्याकडे आपला कोचिंग स्टाफ तयार करण्याची पुरेशी संधी आहे.

सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक बनण्याबाबत झहीर खान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या निवेदनात ते म्हणाले, “आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एकाचा भाग होणे ही सन्मानाची गोष्ट आहे. एक क्रिकेटपटू म्हणून मी मैदानात सीएसकेचा सामना केला आहे आणि त्या सामन्यांचा आनंद घेतला आहे. चेपॉकवर सुपरफॅन्सद्वारे निर्माण केलेले वातावरण खरोखरच खास असते. या मोठ्या फ्रँचायझीचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून झहीर खान यांची नियुक्ती करण्यात एमएस धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली. सीएसके (CSK) व्यवस्थापनाकडे या पदासाठी झहीरचे नाव त्यानेच सुचवले होते ही बाब खुद्द सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीच दुजोरा देऊन स्पष्ट केली आहे. धोनीने जरी मुख्य प्रशिक्षकाची निवड केली असली, तरी कोचिंग स्टाफमध्ये त्याची भूमिका असण्याची शक्यता नाही, तो अधिकार झहीर खानकडे असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---