वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै) खेळला जाणार आहे. त्रिनिदाद, पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियम येथे हा सामना खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारत १-० असा पुढे आहे. यामुळे हा सामना जिंकत भारत मालिका खिशात घालण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली मालिकेत पुनरागमन करण्यास आतुर आहे.
ही मालिका भारत शिखर धवन (Shikhar Dhawan)याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पहिला सामना भारताने जिंकला असला तरी त्या सामन्यात यजमान संघाचे पारडे शेवटच्या षटकापर्यंत जड वाटत होते. ३०८ धावांचे लक्ष्य दिलेला हा सामना भारताने अवघ्या ३ धावांनी जिंकला. यामुळे दुसरा सामनाही अटीतटीचा ठरण्याची शक्यता आहे. यासाठी हवामान आणि खेळपट्टी कशी असणार हे जाणून घेऊया.
पहिला सामना ज्या मैदानावर झाला तेथेच दुसरा सामना खेळला जाणार असला तरी हवामानात बदल होऊ शकतो. पहिल्या सामन्यावेळी तेथिल स्थानिक हवामान खात्याने पावसाची शक्यता दर्शवली होती. तर दुसऱ्या सामन्यावेळी हवामान स्वच्छ राहण्याची टक्केवारी अधिक आहे. तापमान ३१ ते २४ डिग्री सेल्सिअसपर्यंत असणार आहे. हवेचा वेगही सामान्य राहणार आहे. तर पावसाची शक्यता २०टक्केच आहे. यामुळे या सामन्याच्या वेळी हवामान उत्तम असणार आहे.
पहिला सामन्यात फलंदाजांसाठी ही खेळपट्टी उपयुक्त ठरली आहे. पहिल्या सामन्यात ६००च्या वर धावा झाल्या तर १३च विकेट्स पडल्या होत्या. ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी योग्य ठरली आहे. मात्र भारताचा महत्वाचा फिरकीपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या पण सामन्यास दुखापतीमुळे मुकणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला फलंदाजीत नाही तर गोलंदाजीत त्याची उणीव जाणवली आहे. तर दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे.
वेस्ट इंडिज संघाकडे गुडाकेश मोटी आणि अकिल हुसैन हे फिरकीपटू आहेत ज्यांनी मागच्या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत. तर बाकीच्या विंडिज गोलंदाजांपेक्षा त्याचा इकोनॉमी रेट ५.५च्या आसपास राहिला आहे. भारताकडे फिरकीपटूंमध्ये अक्षर पटेल, युझवेंद्र चहलसोबत दिपक हुड्डा हे फिरकीपटू आहेत. हुड्डाने मागच्या सामन्यात ५ षटके टाकताना २२ धावा दिल्या होत्या. दोन्ही संघाच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यात धावांचा रतीब घातला होता. तर शार्दुल ठाकुर आणि मोटी या गोलंदाजांनीही मोठ्या ठरत असलेल्या भागीदाऱ्या तोडण्यात महत्वाची भुमिका बजावली आहे.
पहिल्या सामन्यात रोमांचक विजय मिळवणारा भारत दुसऱ्या सामन्यातही जेता ठरत मालिका जिंकणार की यजमान संघ दुसरा सामना जिंकत मालिकेत परतणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘देशासाठी काहीही करायला तयार’, टी२० विश्वचषकापूर्वी कोहलीची हुंकार; वाचा संपूर्ण स्टेटमेंट
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात होणार मोठा बदल! ‘या’ स्टार खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी
WIvsIND: टीम इंडिया जिंकल्यास पाकिस्तानचा करणार खेळखंडोबा! वाचा काय आहे समीकरण