भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या येत्या वनडे मालिकेवर आहे. मात्र तत्पूर्वीच भारतीय संघाच्या ताफ्यात कोविड-१९ महामारीने शिरकाव (Covid 19 Crisis In Team India) केला असल्यामुळे यजमानांची डोकेदुखी वाढली आहे. ५ क्रिकेटपटूंसह भारताच्या संघातील ८ सदस्य कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने मयंक अगरवाल याला संघात सहभागी केले आहे. यानंतर संघ व्यवस्थापनाने अजून एका खेळाडूला वनडे संघात जागा दिली आहे. हा खेळाडू युवा यष्टीरक्षक आणि कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) चा माजी संघ सहकारी ईशान किशन (Ishan Kishan) असल्याचे समजत आहे.
६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय खेळाडू अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. तसेच ज्या खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्या खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे. यांमध्ये ईशानचाही समावेश होता.
एका अनुभवी अधिकाऱ्याने वृत्त संस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ईशान जो एक विशेषज्ञ सलामीवीर आहे. त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघात सहभागी (Ishan Kishan Added In ODI Squad) केले गेले आहे. त्यामुळे तो रोहितसोबत सलामीला फलंदाजी करण्याची शक्यता आहे.
ईशान इंडियन प्रीमीयर लीगमध्ये रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. तसेच या धाकड फलंदाजाने भारताकडून २ वनडे सामनेही खेळले आहेत. यादरम्यान एका अर्धशतकासह त्याने ६० धावाही केल्या आहेत.
भारतीय संघात कोरोनाचा स्फोट
दरम्यान बुधवारी (०२ फेब्रुवारी) भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडू शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि राखीव खेळाडू नवदीप सैनी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याव्यतिरिक्त संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप, मसाजीस्ट राजकुमार व अन्य एक सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असून या सर्वांना विलगीकरण ठेवण्यात आले आहे. तसेच गुरुवारी टी२० संघात सहभागी असलेला आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा पर्यायी खेळाडू अक्षर पटेल हादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारत खेळेल १०००वा वनडे सामना
भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात आत्तापर्यंत १३३ वनडे सामने खेळले आहेत. यातील ६४ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तसेच वेस्ट इंडिजने ६३ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले आहेत, तर ४ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
विशेष गोष्ट अशी की, भारत आणि वेस्ट इंडिज संघात ६ फेब्रुवारी रोजी होणारा वनडे सामना हा भारताचा १००० वा वनडे सामना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-विंडीज वनडे मालिकेचा मार्ग मोकळा! कर्णधार रोहितसह ‘हे’ खेळाडू सरावासाठी मैदानात
मयंक अगरवाल नसेल पंजाब किंग्जचा नवा संघनायक? फ्रँचायझीचं जरा वेगळंच आहे मत
तमिळ थलाईव्हाजचा तेलुगू टायटन्सवर एकतर्फी विजय, ४३-२५ च्या फरकाने मारली बाजी