भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi 1st odi) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) याने चार विकेट्स घेऊन भारताचा विजय सोपा बनवला. या कामगिरीसाठी चहलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित देखील केले गेले. चहलने सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला मुलाखत दिली. यादरम्यान त्याने सामन्यात वापरलेल्या रणनीतीचा खूलासा केला आहे. त्याच्या मते रोहितने गुगलीसंदर्भात दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला फायदा झाला.
बीसीसीआय टीव्हीसाठी घेतल्या गेलेल्या या मुलाखतीत युजवेंद्र चहल म्हणाला की, “आम्ही सामना सुरू होण्यापूर्वी चर्चा केली होती. सामन्यापूर्वी तू (रोहित शर्मा) जी गोष्ट सांगितली, त्याची कमतरता मला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जाणवली होती. मी त्याठिकाणी जास्त गुगली टाकली नव्हती, त्यामुळे ही गोष्ट माझ्या डोक्यात होती. वेस्ट इंडीजच्या मोठे फटके खेळणाऱ्या खेळाडूंनी जेव्हा मोकळेपणाने खेळायला सुरुवात केली, तेव्हा तू मला म्हणाला होता की मी जेवढ जास्त गुगली टाकेल, माझा लेग स्पिन तेवढाच जास्त प्रभावी होईल. सराव सत्रात मी तुझ्या विरोधात तशीच गोलंदाजी केली आणि असे वाटले की, त्यामुळे फायदा झाला.”
चहलने सांगितल्यानुसार जेव्हा तो संघातून बाहेर होता, तेव्हा त्याने गोलंदाजीचा ऍन्गल बलण्यासाठी सराव केला. तो पुढे बोलताना म्हणाला की, “माझ्या दृष्टीकोणातून मी बदल केला. याठिकाणची खेळपट्टी संथ होती. जेव्हा मी संघात नव्हतो, तेव्हा काय सुधारणा केली जाऊ शकते, यावर विचार केला. मी अन्य गोलंदाजांकडे पाहिले, जे या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी साइड आर्म वापरतात. मी पाहिले की, जेव्हा मी नेट गोलंदाजी करतो, तेव्हा चेंडू वेगात जातो आणि मनगटाची गरज पडत नाही”
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात चहलने निकोलस पूरनची विकेट घेतली आणि एकदिवसीय क्रिकेटमधील स्वतःच्या १०० विकेट्स पूर्ण केल्या. याविषयी बोलताना चहल म्हणाला, “ही उपलब्धी मिळवणे एक चांगला अनुभव आहे. माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत चढउतार आले. पण हा चांगला अनुभव होता की, तुम्ही एखाद्या प्रकारात १०० विकेट्स घेता, ही मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट एवढ्या लवकर होईल, असा मी कधीच विचार केला नव्हता.”
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना ९ फेब्रुवारी आणि तिसरा सामना ११ फेब्रुवारीला खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
हरभजन म्हणतोय,’ अनिल भाई तुम्ही खूप लालची आहात’; वाचा संपूर्ण प्रकरण
U19 विश्वचषक गाजवल्यानंतरही ‘त्या’ दोघा दुर्दैवी गोलंदाजांची कारकीर्द बहरलीच नाही
दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेटपटूने टिपला जॉंटी रोड्स स्टाईल एकहाती झेल, पाहा व्हिडिओ