सध्या भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi t20 series) संघांमध्ये कोलकत्ताच्या ईडन गार्डन्सवर टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर ८ धावांनी विजय मिळवला. सामन्याबरोबरच भारताने ही मालिका सुद्धा आपल्या खिशात घातली आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने(virat kohli) चमकदार कामगिरी केली आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने(rohit sharma) विराट कोहलीच्या खेळीचे कौतुक केले आहे.
सामना संपल्यानंतर समलोचक हर्षा भोगले यांनी रोहित शर्माला विराटच्या खेळीवर विचारले असता, रोहित म्हणाला की, “तो शानदार खेळला. त्याने ज्या पद्धतीने खेळायला सुरुवात केली, तेव्हा माझ्यावरील दबाव कमी झाला. आम्ही चांगली सुरुवात केली नाही. परंतु विराट आला आणि चांगले शाॅट खेळला. त्याने असे शाॅट खेळणे डोळ्यांना आराम देण्यासारखे होते.” रोहितने विराटशिवाय रिषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांच्या खेळीचे कौतुक केले आहे.
या सामन्यात भारतीय संघ फलंदाजीची सुरुवात चांगली करु शकला नाही. इशान किशन अगदी सहजपणे बाद झाला. तसेच रोहितही १९ धावांवर बाद झाला. नंतर विराट आला आणि त्याने ५२ धावांची खेळी करत भारतीय संघाला १८७ धावा करण्यास मोठे योगदान दिले. त्याने त्याच्या खेळीमध्ये ७ चौकार आणि एक षटकार मारला.
या सामन्यात विराट कोहली संपूर्ण आत्मविश्वासाने उतरला होता, जो मागील काही डावांमध्ये दिसला नव्हता. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार पुन्हा एकदा रंगात परतल्याची चर्चा चाहत्यांमध्ये होती. या सामन्यात विराटशिवाय रिषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांनी ७० हून अधिक धावांची भागीदारी केली. रिषभने आपले अर्धशतक पूर्ण करत २८ चेंडूत ५२ धावा केल्या. तसेच व्यांकटेश अय्यरने १८ चेंडूत ३३ धावा केल्या.
मागील सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी भारताचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात मोठी खेळी करु शकला नाही. त्याने १८ चेंडूत एक षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने १९ धावा केल्या. पहिल्या टी२० सामन्यात रोहितने १९ चेंडूत ४० धावा केल्या होत्या. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना कोलकतामध्ये २० फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भुवीवर टीका होत असूनही का दिली जात आहे खेळण्याची संधी? कर्णधार रोहित शर्माने केले स्पष्ट
रणजी ट्रॉफीत आले अब्दुल समदचे वादळ! झंझावाती शतकासह मोडले अनेक विक्रम
पंत-अय्यरच्या भागिदारीने सामन्याला चढली रंगत, असा विक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय जोडी