जगातील सर्व क्रीडास्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे शुक्रवारी (२३ जुलै) बिगुल वाजणार आहे. जपानची राजधानी टोकियो येथे ही स्पर्धा सुरू होईल. कोरोनाचे सावट असल्या कारणाने यावेळी स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच वेळी, स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरेनुसार सर्व देशांच्या खेळाडूंचे संचलन होणार असले तरी, त्यावरही काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारताच्या पथकातील केवळ २६ सदस्यांना या संचलनात भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शुक्रवारी होणार ऑलिम्पिकचे उद्घाटन
नियोजित कार्यक्रमानुसार २०२० मध्ये होणारी ही ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलून आयोजित केली जात आहे. या वर्षी देखील कोरोणाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने अनेक निर्बंधांसह स्पर्धा पार पाडावी लागेल. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात प्रत्येक देशातर्फे केवळ निवडक खेळाडू व प्रशिक्षकांना परंपरागत संचलनात सहभागी होण्याची परवानगी दिली गेली आहे.
हे असणार भारताचे ध्वजवाहक
शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकातर्फे २६ सदस्य संचलनात भाग घेतील. यामध्ये २० खेळाडू व ६ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. भारताच्या पथकाचे ध्वजवाहक म्हणून २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी बॉक्सर मेरी कोम व हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना संधी देण्यात आली. परवानगी देण्यात आलेल्या २० खेळाडूंमध्ये ४ टेबल टेनिसपटू, चार नौकानयनपटू, प्रत्येकी एक तलवारबाज, जिम्नॅस्ट व हॉकीपटूचा समावेश असून, सर्वाधिक आठ बॉक्सर्सचा समावेश आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे सर्वात मोठे पथक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आजवरचे सर्वात मोठे पथक सहभागी होणार आहे. यामध्ये, १२७ खेळाडूंचा समावेश असेल. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने केवळ दोन पदके मिळाली होती. या वर्षी भारतीय संघाला कमीत कमी १० पदके मिळवण्याची आशा आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा, तिरंदाजीपटू दीपिका कुमारी, कुस्तीपटू बजरंग पुनिया व विनेश फोगट यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. नेमबाजीत भारताला चार पदके मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! ‘या’ दिग्गजाने दीपक चाहरला दिला होता क्रिकेट सोडण्याचा सल्ला
उद्या पार पाडणार टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन समारंभ; कमीत कमी भारतीय खेळाडू होणार सहभागी