इमर्जिंग एशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या अनुभवी संघाने भारतीय संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवताना 128 धावांनी मोठा विजय मिळवला. साखळी फेरी व त्यानंतर उपांत्य फेरीत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली होती. मात्र, अंतिम सामन्यात भारतीय संघाला यश मिळाले नाही. असे असले तरी, या स्पर्धेत काही भारतीय खेळाडूंनी लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली.
निशांत सिंधू- भारतीय संघाला अंतिम फेरीत नेण्यात अष्टपैलू निशांत सिंधू याचे महत्त्वाचे योगदान होते. तोच स्पर्धेचा मानकरी देखील ठरला. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 11 बळी आपल्या नावे केले. उपांत्य फेरीत बांगलादेशविरुद्ध केवळ 20 धावांमध्ये त्याने पाच जणांना तंबूचा रस्ता दाखवलेला. तसेच फलंदाजीतही तो महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. भविष्यात डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज व एक दमदार फलंदाज म्हणून तो भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे.
मानव सुतार- या स्पर्धेआधी मानव सुतार याने कोणत्याही प्रकारचा लिस्ट ए सामना खेळला नव्हता. राजस्थानसाठी क्रिकेट खेळणाऱ्या मानव याने या स्पर्धेत आपल्या फिरकी गोलंदाजीने दहा फलंदाजांना बाद केले. योग्य दिशा आणि टप्पा ठेवत गोलंदाजी करण्यात त्याचा हातखंडा दिसून आला. आगामी काळात तो आयपीएल व भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे.
राजवर्धन हंगरगेकर- मागील वर्षी अंडर 19 विश्वचषक व त्यानंतर आयपीएलमध्ये नाव कमावलेला महाराष्ट्राचा अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकर याची या स्पर्धेतील कामगिरी सातत्यपूर्ण राहिली. फलंदाजीची संधी कमी मिळाल्यानंतरही त्याने गोलंदाजीत आपल्या वेगाने सर्वांना चकित केले. त्याने स्पर्धेत दहा फलंदाज बाद केले. पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेण्याचे कामगिरी देखील त्याने नोंदवली. तसेच क्षेत्ररक्षणात तो उठून दिसला.
यश धूल- भारतीय संघाचा कर्णधार यश धूल याची कामगिरी देखील लक्षवेधी राहिली. त्याने स्पर्धेत एक शतक व एक अर्धशतकासह 234 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने आपल्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात भारतीय संघाच्या मध्य फळीत त्याला स्थान मिळू शकते.
अभिषेक शर्मा- मागील जवळपास पाच वर्षांपासून भारतीय क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्मा यांनी या स्पर्धेत आपण मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी तयार असल्याचे सिद्ध केले. त्याने स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक 221 धावा केल्या. यासोबतच गोलंदाजीतही त्याने संघासाठी वेळोवेळी योगदान दिले.
(India A Stars Shines In Emerging Asia Cup 2023 Nishant Sindhu Yash Dhull Rajvardhan Hangargekar)
आणखी वाचा:
एशिया कप फायनलमध्ये यंग इंडियावर अन्याय? पंचांनी केल्या दोन अक्षम्य चुका
त्रिनिदाद कसोटीवर भारतीय संघाची मजबूत पकड! चौथा दिवस रोहित-किशनच्या नावे