भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन संघात तीन दिवसीय सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या डावात भारताची सुरुवात खराब
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताची सुरुवात खराब झाली, सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल या दोघांना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भोपळाही फोडू दिला नाही.
हनुमा विहारीही लवकरच परतला तंबूत
अनुभवी फलंदाज हनुमा विहारीने संयमीपणे डावाची सुरुवात केली. मात्र, त्यालाही मोठी खेळी करता आली नाही.
पुजारा-रहाणे जोडीने सावरला डाव
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि दिग्गज भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला आणि जबाबदारीने खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मदत केली.
रहाणेने केल्या 117 धावा
चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात 54 धावांची खेळी केली, तर अजिंक्य रहाणे 117 धावांवर नाबाद राहिला. भारताने पहिला डाव 247 धावांवर घोषित केला.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर विल पुकोवस्की आणि जो बर्न्स लवकर तंबूत परतले.
कॅमेरॉन ग्रीनने लगावले शतक
मात्र, युवा फलंदाज कॅमेरॉन ग्रीनने केलेल्या नाबाद 125 धावांमुळे या संघाने भारतीय संघावर 59 धावांची आघाडी घेत 309 धावांवर डाव घोषित केला.
यादव, सिराज यांनी केली जबरदस्त गोलंदाजी
भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3, तर फिरकीपटू आर अश्विन याने 2 गडी बाद केले.
दुसऱ्या डावात भारताची अवस्था बिकट
भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉ याला काही खास कामगिरी करता आली नाही. अवघ्या 19 धावा करून तो तंबूत परतला. त्यानंतर पहिल्या डावात मोलाची कामगिरी बजावणारा चेतेश्वर पुजारा याला एकही धाव करता आली.
शुबमन गिल जबाबदारीने डाव पुढे नेईल असं वाटत असतानाच वेगवान गोलंदाज मार्क स्टेकेटी याने त्याला 29 धावांवर झेलबाद केले.
विहारी-रहाणे करत आहेत फलंदाजी
दुसऱ्या डावात 12.4 षटकांत भारताची धावसंख्या 3 बाद 53 अशी आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी फलंदाजी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाची वाढली डोकेदुखी; ‘हा’ प्रमुख खेळाडू होऊ शकतो पहिल्या कसोटीतून बाहेर
आयसीसीची नवी कसोटी क्रमवारी झाली जाहीर, ‘या’ भारतीय खेळाडूंचा अव्वल दहामध्ये समावेश