ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक खेळला जाईल. आठव्यांदा होत असलेल्या टी२० च्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलिया गतविजेता व यजमान अशा दोन पाट्या घेऊन मैदानात उतरणार आहे. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोण भिडेल, याबाबत ऑस्ट्रेलियाला दोन वेळा वनडे विश्वचषक जिंकून देणाऱ्या रिकी पॉंटिंग याने भाकीत केले आहे. त्याच्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलिया व भारतीय संघ या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळतील.
पॉंटिंगने नुकतीच आयसीसीच्या संकेतस्थळाशी चर्चा केली. आयसीसी रिव्ह्यू या कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला,
“मला वाटते की भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश अंतिम फेरीत खेळतील. ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभूत करेल. गतविजेत्या ऑस्ट्रेलियासाठी ही घरची परिस्थिती आहे. हीच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरेल. यामुळे ते विजेतेपद राखू शकतात. मागील वर्ष त्याच्यासाठी हे थोडे कठीण गेले होते. वस्तुस्थिती अशी आहे की, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ संयुक्त अरब अमिरातीला गेला होता. तेव्हा अनेकांना वाटत होते की, आयपीएलसारखी परिस्थिती ऑस्ट्रेलियाला विजयापासून वंचित ठेवेल. मात्र, त्यांनी यातून मार्ग शोधून काढला.”
पॉंटिंगने याच मुलाखतीत सर्व क्षेत्रात मजबूत असलेल्या तीन संघाबाबत बोलताना भारत आणि ऑस्ट्रेलिया सोबतच इंग्लंड संघाचे देखील नाव घेतले.
मागील वर्षी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत त्यांनी आपले पहिले विजेतेपद पटकावलेले. दुसरीकडे भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेला. पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्याने भारतीय संघ आपल्या गटात पहिल्या दोन स्थानावर राहू शकला नव्हता. यावर्षी मागील वर्षाचे अपयश धुवून काढण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाकडे असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!
‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान