इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील नॉटिंघम येथील पहिला सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाला या सामन्यात विजयाची संधी होती. मात्र, पावसामुळे अखेरच्या दिवसाचा खेळ न झाल्याने भारत विजय मिळवू शकला नाही. मालिकेतील दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांना एक धक्का बसला. कारण, पहिल्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याने दोन्ही संघांना दंड सहन करावा लागला आहे. तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात दोन्ही संघांसाठी निराशाजनक राहिली.
दोन्ही संघांना सोसावे लागले नुकसान
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी संथ गतीने षटके टाकल्याप्रकरणी दोन्ही संघांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३ च्या गुणतालिकेत प्रत्येकी दोन गुणांची पेनल्टी दिली. यासह, मॅच फीच्या ४० टक्के दोन्ही संघांना दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारचे नुकसान सहन करावे लागल्याने उभय संघांना पुढील वाटचालीत अडचण निर्माण होऊ शकते.
असा राहिला पहिला सामना
नॉटिंघम येथील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १८३ धावांवर संपुष्टात आला. यानंतर, भारताने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या डावात ३०३ धावांची मजल मारली आणि भारतासमोर विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एक गडी गमावून ५२ धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारताचे पारडे जड दिसत होते. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. मात्र, पावसामुळे एकही चेंडू न टाकला गेल्याने भारत विजय संपादन करू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
नॉटिंघम कसोटीतील भेदक गोलंदाजीचा बुमराहला झाला फायदा, नव्या क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानावर
भारत-इंग्लंड दोन्ही संघांना लॉर्ड्स कसोटीपूर्वी बसले जबरदस्त धक्के, ‘हे’ वेगवान गोलंदाज झाले जखमी
सलाम तुमच्या कामगिरीला! १९८३ च्या विश्वचषकात भारतासाठी नायक ठरलेले ‘यशपाल शर्मा’






