संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सध्या टी२० विश्वचषकाचा थरार सुरु आहे. १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्या पहिली फेरी सुरु आहे. या फेरीतील सामने २२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर सुपर १२ फेरीला सुरुवात होईल. त्यामुळे सध्या सुपर १२ फेरीत थेट प्रवेश केलेल्या संघांचे सराव सामने सुरु आहेत. दरम्यान, अशाच सराव सामन्यावेळी भारत आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू एकमेकांना भेटले. त्यांच्या भेटीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी सुपर १२ मध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे सामने २३ ऑक्टोबरपासून सुरु होतील. दरम्यान, दुबईमध्ये सोमवारी(१८ ऑक्टोबर) भारताने इंग्लंडविरुद्ध, तर वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध सराव सामने खेळले. यावेळी दुबईत भारत आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची भेट झाली. यादरम्यानचे फोटो दोन्ही बोर्डांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करण्यात आले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाचा मार्गदर्शक एमएस धोनी आणि वेस्ट इंडिजचा अनुभवी आणि आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यांच्यातील चर्चेदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंना बीसीसीआयने कॅप्शन दिले की ‘दोन दिग्गज, एक संस्मरणीय क्षण. जेव्हा एमएस धोनी आणि ख्रिस गेल एकमेकांना भेटले.’
https://twitter.com/BCCI/status/1450159940987863042
तसेच वेस्ट इंडिजने चार फोटो पोस्ट केले आहेत. या चार फोटोतील एक फोटो धोनी आणि ड्वेन ब्रावो यांचा आहे. तसेच दुसरा एक फोटो रिषभ पंत आणि निकोलस पूरनचा आहे. तर, एका फोटोमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघांचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फिल सिमन्स आणि मॅथ्यू हेडन आहेत. त्याचबरोबर आणखी एक फोटो आहे, ज्याच ख्रिस गेल दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनसह उभा आहे.
या फोटोंना वेस्ट इंडिजने कॅप्शन दिले आहे की ‘दुबईत चांगल्या भावना आणि स्मित हास्याव्यतिरिक्त आणखी काही नाही.’
https://twitter.com/windiescricket/status/1450149574937563136
माजी कर्णधार एमएस धोनी सध्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची भूमीका निभावत आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सला जिंकून दिले आहे. यावेळी धोनी आणि ब्रावो चेन्नईकडून एकत्र खेळताना दिसले होते. पण, आता हे दोघेही आपापल्या देशाच्या संघासाठी वेगवेगळी भूमिका निभावताना दिसतील.
सुपर १२ साठी अशी आहे गटवारी
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच या गटातही पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील.
सराव सामन्यात भारत-पाकिस्तानचा विजय
सुपर १२ फेरीआधी सर्व संघ प्रत्येकी २ सराव सामने खेळणार आहे. त्यातील भारत आणि पाकिस्तान या संघांनी त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात विजय मिळवले आहे. भारताने इंग्लंडला, तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजला प्रत्येकी ७ विकेट्सने पराभूत केले आहे. आता भारताचा पुढील सराव सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि पाकिस्तानचा सराव सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकाविरुद्ध सुपर १२ फेरीतील सामना खेळत या विश्वचषकातील आपल्या अभियानाला सुरुवात करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेरपर्यंत रंगला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सराव सामना; कांगारूंचा नाट्यमय विजय
क्लीन बोल्ड! शमीच्या अप्रतिम चेंडूने उडवला धोकादायक बटलरचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ
इंग्लंडविरुद्ध सराव सामना जिंकल्यानंतरही ‘या’ दोन गोलंदाजांनी वाढवली टीम इंडियाची चिंता






