भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला जात आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल अडीच तासानंतर सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. आठ षटकांच्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला 90 धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने स्वतः जबाबदारी घेत आक्रमक 46 धावा करून संघाला 6 गडी राखून विजयी केले. यासह तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आली आहे.
2ND T20I. 7.2: Daniel Sams to Dinesh Karthik 4 runs, India 92/4 https://t.co/PMFUaJCvS8 #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 23, 2022
अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या षटकात मागील सामन्याचा सामनावीर कॅमेरून ग्रीन हा विराट कोहलीच्या थेट फेकीवर धावबाद झाला. त्याच षटकाच्या अखेरचा चेंडूवर अक्षर पटेलने धोकादायक मॅक्सवेलला पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. आक्रमक फलंदाजासाठी ओळखल्या जाणार्या टीम डेव्हिडलाही त्याने चौथ्या शतकात अवघ्या दोन धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. तीन महिन्यानंतर करत असलेल्या बुमराहने धोकादायक दिसत असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचचा त्रिफळा उडवत पुनरागमन साजरे केले.
त्यानंतर मागील सामन्यात मॅचविनिंग खेळी केलेल्या मॅथ्यू वेडने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून देत आक्रमक फलंदाजी केली. त्याने हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात तीन षटकार लगावत ऑस्ट्रेलियाला 90 धावांपर्यंत पोहचविले. वेड 20 चेंडूवर 43 धावा करून नाबाद राहिला. अक्षर पटेलने भारतासाठी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल यांनी सलामी दिली. जोस हेजवूडच्या पहिल्या षटकात वीस धावा वसूल करत त्यांनी दमदार सुरुवात केली. मात्र, राहुल वैयक्तिक 10, विराट कोहली 11 व सूर्यकुमार यादव शून्य धावांवर बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा परिस्थितीत रोहितने संयम न गमावता आपली लढाई सुरू ठेवली. हार्दिक पंड्यादेखील 9 धावांचे योगदान देऊ शकला. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत भारताचा विजय जवळपास नक्की केला. पुढच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने संघाला विजय मिळवून दिला. रोहितने अखेरपर्यंत नाबाद राहत 46 धावांची खेळी केली. भारताने हा सामना चार चेंडू राखून आपल्या नावे केला.