आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारतीय हॉकी संघानं आपली विजयी मालिका सुरू ठेवली आहे. शनिवारी (14 सप्टेंबर) चीनमधील हुलुनबुर येथे झालेल्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगनं (13वं मिनिट आणि 19वं मिनिट) दोन्ही गोल केले. दुसरीकडे, पाकिस्तानकडून एकमेव गोल अहमद नदीमनं (7व्या मिनिटाला) केला.
सामन्यादरम्यान पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. खेळाच्या सातव्या मिनिटाला हन्नान शाहिदनं झटपट भारतीय वर्तुळात पोहोचून अहमद नदीमकडे पास दिला. त्यानं भारताचा गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक याला चकवून गोल केला. पहिला धक्का बसल्यानंतर सुमारे 6 मिनिटांनी भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बरोबरी साधली. दुसरा क्वार्टर भारताच्या नावे राहिला, ज्यात हरमप्रीत कौरनं पेनल्टी कॉर्नरद्वारे दुसरा गोल केला.
हाफ टाईम पर्यंत भारत 2-1 ने आघाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्ताननं बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. परंतु भारताच्या बचावफळीनं ही संधी हाणून पाडली. या क्वार्टरमध्ये भारतीय संघालाही गोल करण्याच्या संधी होत्या, पण संघाला त्याचा फायदा घेता आला नाही. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.
भारतीय हॉकी संघाचा चालू स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. टीम इंडियानं मागील सामन्यात दक्षिण कोरियाचा 3-1 असा पराभव केला होता. त्याआधी भारतानं मलेशियाचा 8-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी भारतीय हॉकी संघानं चीनचा 3-0 आणि जपानचा 5-0 असा पराभव केला होता.
हेही वाचा –
टीम इंडियाला मिळाला रोहितचा बॅकअप ओपनर, दुलीप ट्रॉफीत ठोकलं शानदार शतक!
कपिल शर्माच्या शोमध्ये रोहितसह दिसणार भारताचे हे वर्ल्डकप विजेते स्टार्स! प्रोमो व्हिडिओ लॉन्च
भारत पाकिस्तानचा विक्रम मोडणार! बांग्लादेश कसोटी मालिकेत मोठी संधी