भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना गुवाहाटी येथे सुरू झाला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 237 धावा उभारलेल्या. याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर व क्विंटन डी कॉक यांनी शानदार फलंदाजी केली. मात्र, तरीही भारतीय संघाने 16 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली. यासोबतच भारतीय संघाने प्रथमच मायदेशात दक्षिण आफ्रिकेला मालिकेत पराभूत केले.
2ND T20I. India Won by 16 Run(s) https://t.co/R73i6Rr0O2 #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 2, 2022
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी धमाकेदार सुरुवात केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्य गोलंदाजांचा घाम काढत 9.5 षटकात 96 धावांची भागीदारी केली. रोहितने 43 तर राहुलने 28 चेंडूवर 57 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर अनुभवी विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी अक्षरशः विरोधी गोलंदाजांची पिसे काढत षटकार-चौकारांचा पाऊस पडला. दोघांनी शतकी भागीदारी केली. 22 चेंडूवर 61 धावांची तुफानी खेळी करत सूर्यकुमार धावबाद झाला. विराटने नाबाद 49 तर दिनेश कार्तिकने नाबाद 17 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात कमालीची खराब झाली. कर्णधार टेंबा बवुमा 7 चेंडू खेळून एकही धाव न करता बाद झाला. रायली रुसोही खाते ही खोलू शकला नाही. ऐडन मार्करमने 19 चेंडूंवर आक्रमक 33 धावांचे योगदान दिले. सुरुवातीपासून हळू खेळणारा क्विंटन डी कॉक नजर बसल्यावर मोठे फटके खेळण्यात यशस्वी ठरला. मात्र, अनुभवी डेव्हिड मिलरने पहिल्यापासून आक्रमक धोरण स्वीकारत 25 चेंडूवर अर्धशतक झळकावले.
डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकापर्यंत नाबाद राहत कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. तो 47 चेंडूत 106 धावा काढत नाबाद राहिला. तर डी कॉकने 69 धावा केल्या. भारतासाठी अर्शदीपने दोन बळी मिळवले. मालिकेतील अखेरचा सामना इंदोर येथे 5 ऑक्टोबर रोजी होईल.