इंडियन प्रीमियर लीगने क्रिकेटजगताला अनेक हिरे शोधून दिले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे, हरियाणाचा राहुल तेवातिया याचे. राहुल गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल हंगामावेळी प्रकाशझोतात आला होता. त्याने किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर एकाच षटकात ५ षटकार ठोकत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला होता. याच राहुल तेवतिया आज २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, त्याच्या आयुष्यातील काही रोमांचक गोष्टी.
काकांच्या मित्राने हेरली क्रिकेटची गुणवत्ता –
राहुल तेवतियाचा जन्म २० मे १९९३ ला हरियाणातील शिही या गावात झाला. राहुलचे वडील वकील आहे. राहुलला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. पण त्याच्यातील क्रिकेटची गुणवत्ता हेरली ती त्याच्या काकांच्या मित्राने. राहुलच्या वडील कृष्णन पाल यांचा छोटा भाऊ धर्मवीर यांच्या मित्राने राहुलमधील क्रिकेटची गुणवत्ता हेरली. तसं त्यांनी धर्मवीर यांना सांगितले. त्यानंतर कृष्णन पाल यांनी राहुलला भारताचे माजी यष्टीरक्षक विजय पाल यांच्या अकादमीमध्ये दाखल केले.
विजय यादव यांचे लाभले मार्गदर्शन –
त्यावेळी राहुल साधारण ८-९ वर्षांचा होता. तसच त्यावेळी तो चेंडू लेग स्पिनही करत होता आणि त्याच्याकडे फलंदाजीही क्षमता असल्याचे विजय यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला अष्टपैलू म्हणून घडवायला सुरुवात केली. त्याच्याकडे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी चांगली क्षमता आहे.
मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी –
तेवतियाने विजय यांच्या मार्गदर्शानाखाली हळुहळू क्रिकेटमध्ये प्रगती करताना हरियाणाच्या १५ वर्षांखालील, १९ वर्षांखालील , २२ वर्षांखालील अशा वयोगटातील संघाकडून क्रिकेट खेळले. मात्र त्याला संघर्ष करावा लागला तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी. कारण हरियाच्या संघात आधीपासूनच अमित मिश्रा, युजवेंद्र चहल, जयंत यादव असे फिरकीपटू होते. त्यामुळे त्याला रणजी ट्रॉफीत आत्तापर्यंत केवळ ७ सामनेच खेळता आले आहेत.
पण अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये मात्र त्याने २१ आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात ६८ सामने खेळले आहेत. यात अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने २७ विकेट्स आणि ४८४ धावा केल्या असून ट्वेटी-ट्वेंटीमध्ये ४२ विकेट्स आणि ९६५ धावा केल्या आहेत.
आयपीएलमधील प्रवास –
२७ वर्षीय राहुल ओएनजेसीसाठी काम करायचा आणि त्यांच्यासाठी क्रिकेट खेळायचा. त्याने या संघाला अनेक स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. त्याला आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी दिली ती राजस्थान रॉयल्सने. २०१४ साली त्याला राजस्थानने १० लाख रुपयांना खरेदी केले. त्याने २०१४ आणि २०१५ च्या आयपीएलमध्ये मिळून राजस्थानसाठी ४ सामन्यात खेळताना १६ धावा केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २०१६ सालचा हंगाम तो खेळला नाही. २०१७ साली त्याला किंग्स इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतले, मात्र यावेळीही त्याला फारसे सामने खेळण्यासाठी मिळाले नाही. त्याने पंजाबसाठी ३ सामने खेळताना १९ धावा आणि ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर २०१८ सालाच्या आयपीएल हंगामासाठी मोठा लिलाव झाला. यावेळी मात्र, राहुलने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याला दिल्ली कॅपिटल्सने तब्बल ३ कोटी रुपयांसह आपल्या संघात सामील केेले. त्याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादनेही पसंती दाखवली होती. पण दिल्लीने ती बोली जिंकत त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले. दिल्लीकडून त्याने २०१८ साली ८ सामने खेळले. यात त्याने ५० धावा आणि ६ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २०१९मध्ये त्याला दिल्लीने संघात कायम ठेवले. त्यावर्षी ५ सामन्यात २६ धावा करता आल्या आणि त्याला केवळ २ विकेट्सच घेता आल्या.
त्यामुळे २०२० आयपीएल हंगामासाठी दिल्लीने त्याला राजस्थान रॉयल्सबरोबर ट्रेड केले. त्यामुळे राहुल पुन्हा त्याच्या पहिल्या संघात परतला. यावेळी मात्र राहुलने सर्वांनाच त्याची कामगिरी लक्षात राहिल असा खेळ केला. त्याने या आयपीएलमध्ये १४ सामन्यात २५५ धावा केल्या आणि १० विकेट्सही घेतल्या. याबरोबरच त्याने खालच्या फळीत फलंदाजीला येत आक्रमक खेळताना सर्वांचेच लक्ष वेधले.
भारताकडून खेळण्याचे स्वप्न अधुरे –
आयपीएल २०२० च्या हंगामात केलेल्या दमदार कामगिरीचे बक्षीस राहुलला भारतीय संघात निवड झाल्याने मिळाले होते. राहुलने फक्त आयपीएलमध्येच नाही तर सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्येही समाधानकारक कामगिरी केली होती. त्याने ६ सामन्यात ८२ धावा आणि २ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे मागील इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु जर भारताकडून अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मात्र त्याला मिळाली नाही. असे असले तरीही, त्याच्यातील प्रतिभा लवकरच त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळण्याची संधी मिळून देईल.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी! ‘ही’ मानाची स्पर्धा झाली रद्द, जून महिन्यात होणार होते आयोजन
भारतात टी२० विश्वचषक होणार की नाही? पाहा कोणत्या दिवशी होणार हा महत्त्वाचा निर्णय
विराटला नावे ठेवण्याआधी त्याने केलेले ‘हे’ काम नक्की पाहा, पाहा आता कुणाच्या आलाय मदतीला