भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली मागील जवळपास दोन वर्षापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. तो चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतोय. तब्बल १००० दिवसांपासून त्याने आंतरराष्ट्रीय शतक झळकावले नाही. विराटला या खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटू सल्ला देत आहेत. आता याच पंक्तीत भारताचे माजी अष्टपैलू चंदू बोर्डे यांचे देखील नाव समाविष्ट झाले आहे.
सध्या ८८ वर्षाच्या असलेल्या बोर्डे यांनी नुकतेच एका मुलाखतीत विराट कोहलीच्या खराब फॉर्मविषयी टिप्पणी केली. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणाले,
“आम्ही १९६८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. तेव्हा सर्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाच्या नेटमध्ये आले. त्यांनी ऑस्ट्रेलियन कर्णधाराला नेटमध्ये प्रत्येक चेंडू मारण्याचा सल्ला दिला. त्यांचा हा सल्ला ऑस्ट्रेलियन कर्णधाराने मनावर घेतला व तशा पद्धतीने सराव केला. पुढे जाऊन त्याने आमच्याविरुद्ध शतक ठोकले. विराटलाही मी तोच सल्ला देईल. त्याने नेटमध्ये यावे आणि आणखी कसून सराव करावा.”
प्रत्येकालाच या काळातून जावे लागते असे देखील बोर्डे म्हणाले. विराट कोहली आयपीएलनंतर केवळ इंग्लंड दौऱ्यावर खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील मालिका, वेस्ट इंडिज दौऱ्यावरही तो सहभागी झाला नव्हता. आता थेट आशिया चषकात खेळताना दिसेल. त्याचा हाच फॉर्म आशिया चषकात राहिला तर, टी२० विश्वचषकासाठी त्याचा संघात समावेश होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण, संधी मिळत असलेले इतर युवा खेळाडू सरस कामगिरी करताना दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
केरळचा इंजिनीयर बनला युएईचा कॅप्टन! आता भारताशीच करणार दोन हात
‘भारताचा इतिहास, पण आशिया चषक पाकिस्तानच जिंकणार!’ माजी कर्णधाराने दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण
फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारा अख्तर वापरतोय ‘कुबड्या’, वाचा कशामुळे आली ही वेळ