---Advertisement---

आजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 8:20 AM
---Advertisement---

सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यात कसोटी मालिका खेळली जातेय. भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने पहिले पाऊल इंग्लंडमध्येच १९३२ साली केलेला. मात्र, इंग्लंडच्या भूमीवर पहिल्या विजयासाठी भारताला ३९ वर्षे वाट पाहावी लागली.

भारताने स्वातंत्र्यापूर्वी १९३२ मध्ये कसोटीचा दर्जा मिळवला. भारत कसोटी क्रिकेट खेळणारा सहावा देश बनला होता. भारतीय संघाला त्यांच्या पहिल्या कसोटी विजयासाठी पुढील २० वर्षे वाट पाहावी लागली. भारताने २४ सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर चेन्नईमध्ये इंग्लंडचा पराभव केला. परंतु, संघाचे अजून एक मोठे स्वप्न शिल्लक होते आणि ते स्वप्न होते इंग्लंडला त्याच्याच भूमीवर हरवणे. शेवटी, १९७१ मध्ये ते स्वप्नही पूर्ण झाले.

असा रंगला ऐतिहासिक सामना
सन १९७१ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला. तेथे कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ३५५ धावा करत इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. या डावात एकनाथ सोलकर यांनी भारतासाठी ३ बळी घेतले. तर बिशनसिंग बेदी, चंद्रशेखर आणि वेंकटराघवन यांनी २-२ बळी घेतलेले.

प्रत्युत्तरात, भारतीय फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज फारूख इंजीनियर यांनी सर्वाधिक ५९ तर, दिलीप सरदेसाई यांनी ५४ धावा केलेल्या. कर्णधार अजित वाडेकर (४८) आणि एकनाथ सोलकर (४४) यांनी उपयुक्त योगदान दिले. धावा केल्या. यासह, भारतीय संघ त्यांच्या पहिल्या डावात २८४ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून रे इलिंगवर्थ यांनी ५ बळी मिळवले.

चंद्रशेखर यांची कमाल
दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ आघाडीसह मैदानात उतरला. मात्र, भागवत चंद्रशेखर यांनी त्यावेळी ऐतिहासिक कामगिरी केली. चंद्रशेखर यांनी अवघ्या ३८ धावा देत ६ बळी टिपले. तर वेंकटराघवन यांनी २ आणि बिशनसिंग बेदींनी एक गडी बाद केला. संपूर्ण इंग्लिश संघ दुसऱ्या डावात फक्त १०१ धावांवर गारद झाला.

भारताचा संस्मरणीय विजय
विजयासाठी केवळ १७३ धावांचे लक्ष्य भारतीय संघासमोर होते. कर्णधार अजित वाडेकर यांनी ४५ आणि दिलीप सरदेसाई यांनी ४० धावांचे योगदान दिले. ज्याच्या आधारे भारताचा संघ २४ ऑगस्ट १९७१ रोजी ६ गडी गमावून जिंकला. भारताला शेवटच्या ९७ धावा करण्यासाठी ३ तास लागले. इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाचा हा पहिला विजय होता आणि त्याबरोबर भारताने ती मालिका १-० ने जिंकली. एवढेच नाही तर, भारताने इंग्लंडची सलग २६ सामन्यांची विजयी मालिकाही खंडित केली.

महत्त्वाच्या बातम्या-
महाराजा टी२० ट्रॉफी: मयंकच्या शतकी ‘ब्लास्ट’ने बेंगलोर फायनलमध्ये; पाटीलचे शतक व्यर्थ
पाकिस्तानच्या गावगप्पा सुरू! ‘तो’ खेळाडू म्हणतोय, “मी रोज १५० सिक्स मारतो”
आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत सैनुमेरो जालन गोशॉक संघाची विजयी सलामी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---