भारत आणि ऑस्ट्रेलिया सांघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या पाचव्या दिवशी झुंजार खेळ दाखवत सामना अनिर्णित अवस्थेत सोडवला. सामन्यावर पूर्णतः ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असताना भारतीय संघाने केलेल्या या खेळाचे संपूर्ण क्रीडा-विश्वाकडून कौतुक केले जात आहे. यादरम्यानच सामनावीर ठरलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथने देखील भारतीय संघाने दाखवलेल्या खेळाचे कौतुक केले आहे.
सामना संपल्यानंतर स्मिथ म्हणाला, ” भारताने आज कडवी झुंज दिली. प्रत्येक वेळी आमचे गोलंदाज उत्तम गोलंदाजी करतच होते. सामन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आम्हाला जाणवले की काही चेंडू असमतोल बाउंसमुळे खाली राहत आहेत तर काही उंचावर जात आहेत. पण आज असे काहीही जाणवले नाही. भारतीय संघाने आज उत्तम संघर्ष केला .”
आपल्या शतकीय खेळीबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला, “जेव्हा तुम्ही देशासाठी शतक करतात तेव्हा प्रत्येक वेळी आनंद होतोच. माझ्या होम ग्राऊंडवर शतक केल्याने समाधान वाटले होते. पण आता तितकासा जास्त आनंद होत नाही, कारण आम्ही सामना जिंकू शकलो नाही .”
मालिकेत सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरलेल्या स्मिथने सिडनी येथे आपले कौशल्य पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दाखवून दिले. स्मिथने पहिल्या डावात शानदार 131 धावांची शतकी खेळी केली तर दुसऱ्या डावातही 81 धावा बनविल्या. आपल्या या कामगिरीबद्दल स्मिथला सामनावीराचा पुरस्कार देखील घोषित करण्यात आला. स्मिथला सिडनी येथे लय सापडली असून ऑस्ट्रेलियन संघाला आशा असेल की तो ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातही उत्तम कामगिरी करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विहारी-जडेजा आऊट; तर बुमराह खेळण्याची शक्यता कमी, अशी असेल ब्रिस्बेन कसोटीतील भारताची प्लेइंग XI
कोण ठेवणार विराट-अनुष्काच्या चिमुकल्या परीचं नाव? ‘ही’ आहे ती भाग्यवान व्यक्ती