भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी20 विश्वचषक 2020च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात या विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.
मागील 6 वर्षात युवा, पुरुष आणि महिला भारतीय संघाने सातत्याने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मात्र भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश येत आहे. मागील 6 वर्षांत भारतीय संघाने 2018 चा 19 वर्षांखालील विश्वचषक वगळता जवळ जवळ सर्व आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उपांत्य किंवा अंतिम सामन्यात पराभव स्विकारला आहे.
2018 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात युवा भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजेतेपद मिळवले होते. या विश्वचषकाचा अपवाद वगळता 2014 च्या टी20 विश्वचषकापासून भारतीय संघ आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
भारताने 2018 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकाचा अपवाद वगळता शेवटचे 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतर भारतीय वरिष्ठ पुरुष संघाने जवळ जवळ 5 आयसीसीच्या स्पर्धा खेळल्या. विशेष म्हणजे यातील सर्व स्पर्धांमध्ये भारतीय संघाने उपांत्य किंवा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र विजेतेपद मिळवण्यात अपयश आले.
तसेच माहिला संघाने या कालावधीत जवळपास 4 आयसीसीच्या स्पर्धा खेळल्या यातील 2 स्पर्धांमध्ये साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. तर 2017 च्या वनडे विश्वचषकात अंतिम सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आणि नंतर 2018 च्या टी20 विश्वचषकात उपांत्य सामन्यात पराभूत व्हावे लागले.
त्याचबरोबर युवा भारतीय संघ 2014, 2016, 2018 आणि 2020 असे चार 19 वर्षांखालील विश्वचषक गेल्या 6 वर्षात खेळला. यातील मागील 3 विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला, मात्र त्यातील केवळ 2018 ला भारताला विजेतेपद मिळवता आले. तर 2014 च्या विश्वचषकात भारतीय संघ 5 व्या स्थानावर राहिला.
त्यामुळे आता मागील अनेक वर्षांपासून आयसीसी विजेतेपदाची भारतीय संघाला लागलेली साडेसाती रविवारी भारतीय महिला संघाला संपवण्याची संधी आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघाला पहिलाच विश्वचषक जिंकण्याचीही संधी आहे.
अशी आहे मागील 6 वर्षांतील आयसीसी स्पर्धांमधील भारतीय संघाची कामगिरी –
2020 –
19 वर्षांखालील विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
महिला टी20 विश्वचषक – अंतिम सामना (??)
2019 –
पुरुष वनडे विश्वचषक – उपांत्य सामना (पराभूत)
2018 –
महिला टी20 विश्वचषक – उपांत्य सामना (पराभूत)
19 वर्षांखालील विश्वचषक – अंतिम सामना (विजयी)
2017 –
महिला वनडे विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
चॅम्पियन्स ट्रॉफी – अंतिम सामना (पराभूत)
2016 –
19 वर्षांखालील विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
महिला टी20 विश्वचषक – साखळी फेरी आव्हान संपुष्टात
पुरुष टी20 विश्वचषक – उपांत्य सामना (पराभूत)
2015 –
पुरुष वनडे विश्वचषक – उपांत्य सामना (पराभूत)
2014 –
19 वर्षांखालील विश्वचषक – 5 वे स्थान
महिला टी20 विश्वचषक – साखळी फेरी आव्हान संपुष्टात
पुरुष टी20 विश्वचषक – अंतिम सामना (पराभूत)
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाला विश्वचषक फायनलमध्ये या खेळाडूच्या ट्विटपासून पराभवाचा धोका?
–महिला टी२० विश्वचषक: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रंगणार फायनल
–निवड समितीच्या नवीन अध्यक्षाविषयी हे माहित आहे का? घ्या जाणून…