भारताचा कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) सर्वाधिक फिट असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. तो अनेकदा फिटनेसबद्दल बोलतही असतो. कोहलीने एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, “झेल घेणे सोपे असते. परंतु, झेल घेण्यासाठी तिथपर्यंत धावत जावे लागते आणि त्यासाठी फिटनेसची आवश्यकता असते.”
बुधवारी (5 फेब्रुवारी ) न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यातदेखील कोहलीने त्याच्या फिटनेसचे प्रदर्शन केले आहे. हेमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना (ODI) पार पडला. या सामन्यात कोहलीने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्सला धावबाद केले.
या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताने दिलेल्या 347 धावांचा पाठलाग करत असताना 28 व्या षटकातील तिसरा चेंडू रॉस टेलरने ऑफ साइडला मारत धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी कव्हर्सच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असलेल्या कोहलीने वेगात धाव घेतली व लांब उडी घेत चेंडू पकडला आणि लगेचच स्ट्रायकर एन्डला स्टंपच्या दिशेने फेकला.
हे पाहताच नॉन स्ट्रायकर एन्डवरुन स्ट्रायकर एन्डला पळत असलेल्या निकोल्सने देखील क्रिजमध्ये पोहोचण्यासाठी लांब उडी घेतली. मात्र कोहलीने फेकलेला चेंडू वेगात आला आणि थेट स्टंपला लागला. तोपर्यंत निकोल्स क्रिजमध्ये पोहोचू शकला नाही. त्यामुळे तो 78 धावांवर धावबाद झाला.
Virat Kohli or Jonty Rhodes? 🤯
That was a brilliant in-the-air throw from the India skipper!
Nicholls is run out for 78.#NZvIND pic.twitter.com/ggtPqjipTm
— ICC (@ICC) February 5, 2020
कोहलीने केलेल्या या थ्रोला बघून अनेकांना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होड्सची आठवण झाली. अगदी आयसीसीनेही विराटच्या या थ्रोबद्दल ट्विट केले आहे की ‘विराट कोहली की जॉन्टी ऱ्होड्स. भारताच्या कर्णधाराकडून जबरदस्त थ्रो. निकोल्स 78 धावांवर धावबाद’
ऱ्होड्स हा क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणला जातो. ऱ्होड्सने 1992 साली झालेल्या विश्वचषकात पाकिस्तानचा फलंदाज इंजमाम उल हकला केलेले धावबाद प्रसिद्ध आहे.
न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात झालेल्या पहिल्याच वनडे सामन्यात भारताला 4 विकेट्सने न्यूझीलंडने पराभूत केले आहे. आता 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना 8 फेब्रुवारीला ऑकलँड येथे खेळण्यात येणार आहे. यावेळी भारताला हा सामना जिंकण्याची नितांत गरज आहे.