रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला कानपूरमध्ये शनिवारी (10 सप्टेंबर) सुरुवात झाली. इंडिया लिजेंड्स व दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील या पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 बाद 217 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा संघ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यासह इंडिया लिजेंड्सने हंगामातील पहिल्या सामन्यात 61 धावांनी विजय मिळवला. स्टुअर्ट बिन्नीला त्याच्या नाबाद झंझावाती अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पहिल्या हंगामाच्या यशानंतर आता या दुसऱ्या हंगामाला कानपूर येथे सुरुवात झाली. छोटेखानी समारंभात स्पर्धेचे उद्घाटन झाले. इंडिया लिजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सचिन तेंडुलकर व नमन ओझा यांनी भारतीय संघाला 46 धावांची सलामी दिली. मात्र, सचिन व नमन सहा धावांच्या अंतराने बाद झाले. त्यानंतर या स्पर्धेत पदार्पण करत असलेल्या सुरेश रैनाने 33 धावांची शानदार खेळी केली.
चौथा क्रमांकवर आलेला स्टुअर्ट बिन्नी सुरुवातीला थोडाफार अडखळत खेळत होता. मात्र, जम बसल्यानंतर त्याने वेगवान फलंदाजी केली. युवराज सिंग मात्र केवळ 6 धावा करत तंबूत परतला. मात्र त्यानंतर आलेल्या युसुफ पठाणने बिन्नीसह मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पडला. त्यांनी चौथ्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी केली. बिन्नीने 42 चेंडूवर 5 चौकार व 6 षटकार ठोकत नाबाद 82 धावा केल्या. तर, पठाणने 15 चेंडूवर 1 चौकार व 4 षटकारांसह 35 धावांचा तडाखा दिला.
प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला 46 धावांची सलामी मिळाली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाचे दोन्ही फिरकीपटू राहुल शर्मा व प्रज्ञान ओझा यांनी फलंदाजांना स्थिर होऊ दिले नव्हते. अखेरीस इंडिया लिजेंड्सने दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला 9 बाद 156 पर्यंत रोखले. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार जॉन्टी रोड्सने सर्वाधिक 38 धावा केल्या. भारतासाठी राहुल शर्माने सर्वाधिक तीन तर प्रज्ञान ओझा व मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.