मुंबई। अनऍकॅडमी आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये वानखेडे स्टेडियमवर प्रकाशझोतात शानदार विजयी सलामी देताना सचिन तेंडुलकरच्या इंडिया लिजंड्सने ब्रायन लाराच्या वेस्ट इंडिज लिजंड्सला सात विकेट राखून हरविले.
यजमान कर्णधार सचिन तेंडुलकर याने नाणेफेक जिंकून आव्हानाचा पाठलाग करण्यास पसंती दिली. वेस्ट इंडिज लिजंड्सने निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 150 धावा केल्या. भारताने हे आव्हान दहा चेंडू राखून पार केले.
सचिनने विरेंद्र सेहवागच्या साथीत 83 धावांची जोरदार सलामी दिली. आक्रमक खेळी करून सचिन बाद झाला. त्यानंतर महंमद कैफ (14) व मनप्रीत गोनी (0) यांना लागपाठ बाद करून रंगत निर्माण केली होती, पण युवराज सिंगने त्याची हॅट्रिक हुकविली. सेहवागने 74 धावांची नाबाद खेळी करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
त्याआधी सहा षटकांच्या पॉवर प्लेमध्ये वेस्ट इंडिजने 1 बाद 50 धावा केल्या. झहीरच्या चेंडूवर लाराने एक लेगबाय घेऊन संघाला हा टप्पा गाठून दिला. डावखुरा सलामीवीर शिवनारायण चंदरपॉलने 61 धावांची खेळी केली. मांडीचा स्नायू दुखावल्यानंतरही त्याने वैद्यकीय उपचार करून घेत फलंदाजी केली. त्यामुळे निवृत्त होऊन काही काळ लोटला असला तरी त्याची आणि एकूण सर्वच सहभागी खेळाडूंचे क्रिकेटवरील प्रेम दिसून आले.
या लढतीत मैदानावरील पंच म्हणून भारताचे अनिल दांडेकर आणि ऑस्ट्रेलियाचे सायमन टॉफेल, दूरचित्रवाणी पंच म्हणून राजेश देशपांडे, तर सामनाधिकारी म्हणून गुंडाप्पा विश्वनाथ यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक।
वेस्ट इंडिज लिजंड्स ।
20 षटकांत 8 बाद 150 (डॅरेन गंगा 32-34 चेंडू, 5 चौकार, शिवनारायण चंदरपॉल 61-41 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, ब्रायन लारा 17-15 चेंडू, 4 चौकार, झहीर खान 4-0-30-2, मुनाफ पटेल 4-0-24-2, प्रग्यान ओझा 4-0-27-2, इरफान पठाण 2-0-12-1)
पराभूत विरुद्ध इंडिया लिजंड्स ।
18.2 षटकांत 3 बाद 151 (विरेंद्र सेहवाग नाबाद 74-57 चेंडू, 11 चौकार, सचिन तेंडुलकर 36-29 चेंडू, 7 चौकार, महंमद कैफ 14, युवराज नाबाद 10, सुलेमान बेन 26-1, कार्ल हुपर 3.2-0-19-2)