कोलकाता । भारतीय संघ २०१८ वर्ष दक्षिण आफ्रिका दौऱ्याने सुरु करणार आहे. केपटाऊन कसोटीने भारतीय संघाचा दौरा सुरु होणार असून ही कसोटी ५ किंवा ६ जानेवारी २०१८ रोजी सुरु होऊ शकते.
‘ESPNCricinfo’ वेबसाइट प्रमाणे भारतीय क्रिकेट बोर्ड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड काही दिवसातच या मालिकेचा कार्यक्रम ठरवतील. या मालिकेच्या वेळापत्रकाबद्दल या दोन देशात संवाद सुरु झाला आहे.
आयसीसीच्या भविष्यातील कार्यक्रमाप्रमाणे ही मालिका ४ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की संघ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आफ्रिकेत येणार नाही कारण श्रीलंका संघाबरोबरची भारतात होणारी मालिका २४ डिसेंबरला संपणार आहे. बीसीसीआयला यावेळेत खेळाडूंनी छोटी विश्रांती घ्यावी असे वाटते तसेच आफ्रिकेबरोबर एक सराव सामना देखील व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
परंपरेप्रमाणे आफ्रिकेत नवीन वर्षात पहिला सामना २ जानेवारी या दिवशी सुरु होतो.