ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर विजायासाठी 340 धावांचं लक्ष्य होतं, मात्र भारतीय संघ अवघ्या 155 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियानं हा सामना 184 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडीही घेतली.
मेलबर्नमध्ये भारतीय संघाला एवढा दारूण पराभव पत्करावा लागेल असं वाटले नव्हतं. या पराभवामुळे चाहते चांगलेच संतापलेले दिसत आहेत. मेलबर्न कसोटीतील पराभवामागे अनेक खेळाडूंची सुमार कामगिरी कारणीभूत होती. या लेखात, आम्ही तुम्हाला अशा 3 भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताच्या पराभवाचं सर्वात मोठे दोषी होते.
(3) रिषभ पंत – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभ पंतनं आतापर्यंत आपल्या बॅटनं खूप निराश केलं आहे. त्याला या मालिकेत अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. त्याची खराब कामगिरी मेलबर्नमध्येही पाहायला मिळाली. या सामन्याच्या दोन्ही डावात तो बेजबाबदार फटके खेळून बाद झाला. पहिल्या डावात पंत 28 धावा केल्यानंतर स्कॉट बोलंडविरुद्ध लॅप शॉट मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला, तर दुसऱ्या डावात तो 30 धावांवर असताना ट्रॅव्हिस हेडविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. अशाप्रकारे पंंतनं दोन्ही डावात चुकीच्या वेळी विकेट फेकून भारताला अडचणीत आणलं.
(2) विराट कोहली – पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीची बॅट थंड पडली आहे. सलग दोन कसोटीत फेल झाल्यानंतर या सामन्यात त्याच्याकड़ून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना या चेजमास्टरकडे भारताला विजय मिळवून देण्याची मोठी संधी होती. परंतु कोहली यावेळी देखील चुकला. दुसऱ्या डावात विराट 29 चेंडूत अवघ्या 5 धावा करून बाद झाला.
(1) रोहित शर्मा – या सामन्यातील भारताच्या दारुण पराभवाचा सर्वात मोठा दोषी म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. या सामन्यात त्यानं केवळ खराब फलंदाजीच केली नाही, तर त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मेलबर्न कसोटीच्या दोन्ही डावात मिळून रोहितनं केवळ 12 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात प्रमुख फलंदाज बाद झाले असतानाही रोहितनं आक्रमक फिल्डिंग लावली नाही, ज्यामुळे कांगारुंच्या अखेरच्या जोडीला सहज धावा करण्याची संधी मिळाली. येथे जर रोहितनं आक्रमकता दाखवली असती, तर सामन्याचं चित्र काहीसं वेगळं असतं.
हेही वाचा –
मेलबर्नमध्ये भारताचा पराभव, आता टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार?
मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी
स्निकोमीटरमध्ये कोणतीही हालचाल नाही, तरीही यशस्वी जयस्वाल आऊट कसा? अंपायरच्या निर्णयामुळे मोठा वाद