रविवारी (२४ जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यात झालेला दुसरा वनडे सामना चित्तथरारक राहिला. भारतीय संघाने शेवटच्या षटकात २ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या विजयासह वनडे मालिकाही २-० च्या फरकाने त्यांच्या नावावर झाली आहे. या मालिका विजयासह भारतीय संघाने मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हा विश्वविक्रम करत पाकिस्तान संघाला मागे सोडले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ (West Indies vs India) निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर ३११ धावा करू शकला. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर शाय होपने (Shai Hope) सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ११५ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार निकोलस पूरनने ६ षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने ७४ धावा फटकावल्या. मात्र एवढी मोठी धावसंख्या उभारूनही भारतीय खेळाडूंच्या सांघिक प्रदर्शनामुळे वेस्ट इंडिजला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
वेस्ट इंडिजच्या ३१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून वरच्या फळीत श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकले. १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ६३ धावांची खेळी केली. तसेच सलामीवीर शुबमन गिलनेही ४३ धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) (५४ धावा) अर्धशतक करून बाद झाला. त्यानंतर खालच्या फळीत अक्षर पटेलने (Axar Patel) ३५ चेंडूत नाबाद ६४ धावांची झंझावाती खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला.
अशाप्रकारे भारतीय संघाने दुसरा वनडे सामना २ विकेट्सने (India Won ODI Series) जिंकला. तत्पूर्वी पहिला वनडे सामनाही भारताने ३ धावांनी आपल्या नावावर केला होता. भारतीय संघाने २-० च्या फरकाने ही वनडे मालिका जिंकत वेस्ट इंडिजविरुद्धची सलग १२ वी (Most Consecutive ODI Series Win) वनडे मालिका जिंकली आहे. कोणत्या संघाने एकाच विरोधी संघाविरुद्ध जिंकलेल्या या सर्वाधिक सलग वनडे मालिका आहेत. २००७ पासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध एकही वनडे मालिका हरलेला नाही.
यापूर्वी भारतीय संघ या विक्रमाच्या खास यादीत पाकिस्तानसह संयुक्तपणे अव्वलस्थानी होता. पाकिस्तानने १९९६ ते २०२१ पर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ वनडे मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. परंतु आता भारतीय संघाने पाकिस्तानला मागे सोडत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
एका संघाविरोधात लागोपाठ वनडे मालिका जिंकणारे संघ (कमीत कमी ३ सामने)
संघ विरोधी संघ मालिका विजय कधीपासून
भारत वेस्ट इंडिज १२* २००७ पासून
पाकिस्तान झिम्बाब्वे ११* १९९६
पाकिस्तान वेस्ट इंडिज १०* १९९९
दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज ९* १९९५
भारत श्रीलंका ९* २००७
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
थरारक विजयासह वनडे मालिका टीम इंडियाच्या नावे; संजू-अक्षर ठरले विजयाचे शिल्पकार
रेल्वेने मारला राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा चौकार; महाराष्ट्र उपविजेता
शुभमंगल : भारताला छळणाऱ्या गोलंदाजाला आयुष्यभर ‘छळणारं’ माणूस मिळालं