---Advertisement---

रेल्वेने मारला राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा चौकार; महाराष्ट्र उपविजेता

On: रविवार, जुलै 24, 2022 11:54 PM
indian railways
---Advertisement---

एमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) मान्यताप्राप्त आणि हरियाणा राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६९ वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप भारतीय रेल्वेने आपल्या नावे केली. अंतिम सामन्यात त्यांनी महाराष्ट्राचा ३८-२२ असा पराभव करत सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.

हरियाणातील चरखी दादरी याठिकाणी ६९ व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचे आयोजन केले गेले होते. देशातील या सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी ३२ संघांनी सहभाग घेतला होता. २१ जुलै ते २४ जुलै या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या भारतीय रेल्वे संघाने अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंनी सजलेल्या महाराष्ट्र संघानेही सर्वांना आश्चर्याचा धक्का देत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला.

 

अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने वेगवान सुरुवात करत आघाडी घेतली होती. मात्र, पहिला हाफ संपण्याआधी नितीन रावळ याने सुपर टॅकल करत रेल्वे संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर महाराष्ट्र संघाचा खेळ घसरला. पहिला हाफ संपेपर्यंत रेल्वे संघाने २०-१३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी आणखी आक्रमक खेळ करत महाराष्ट्र संघाला डोके वर काढू दिले नाही. पूर्ण वेळेनंतर भारतीय रेल्वेने ३८-२२ असा विजय मिळवत ट्रॉफी उंचावली. पवन सेहरावत, नितीन रावळ, संदीप ढोल व संदीप कंडोला या प्रसिद्ध खेळाडूंनी सजलेल्या रेल्वेचे हे सलग चौथे जेतेपद आहे.

तत्पूर्वी, उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने यजमान बलाढ्य हरियाणाचा तर रेल्वेने गोवा संघाचा पराभव केला होता. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिली. शंकर गडाई याच्या नेतृत्वात व माजी भारतीय खेळाडू प्रशांत चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाने सर्व सामने जिंकत अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेली. चढाईपटू अस्लम इनामदार व आकाश शिंदे यांनी आपल्या खेळाने वाहवा मिळवली. अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले असले तरी महाराष्ट्र संघाने सर्वांची मन जिंकणारी कामगिरी केल्याचे महाराष्ट्र कबड्डी वर्तुळातून बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---