गुवाहाटी। भारत विरुद्ध विंडीज संघात आज (21 आॅक्टोबर) पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात विंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 322 धावा करत भारतासमोर विजयासाठी 323 धावांचे आव्हान ठेवले आहे. विंडीजकडून शिमरॉन हेटमेयरने शतक तर कायरन पॉवेलने अर्धशतक केले आहे.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विंडीजकडून फलंदाजीची सुरुवात खराब झाली. त्यांचा पदार्पण करणारा सलामीवीर फलंदाज चंद्रपॉल हेमराज 9 धावांंवर बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले.
त्यानंतर मात्र कायरन पॉवेल आणि शाय होपने विंडीजचा डाव सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचली. पण अर्धशतक करुन पॉवेल बाद झाला. त्याने 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 51 धावांची खेळी केली. त्याला खलील अहमदने बाद केले.
त्याच्या पाठोपाठ 200 वा वनडे सामना खेळणारा मार्लोन सॅम्युएल्स शून्य धावेवर बाद झाला. त्यानंतर काही वेळात होपनेही(32) विकेट गमावली.
यानंतर मात्र हेटमेयर आणि रोवमन पोवेलने पाचव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली. पण 31 व्या षटकात ही भागीदारी तोडण्यात रविंद्र जडेजाला यश आले.
जडेजाने पोवेलला 22 धावांवर असताना त्रिफळाचीत केले. त्यानंतर काही वेळात जडेजानेच शतक करणाऱ्या हेटमेयरलाही डीपमध्ये उभ्या असणाऱ्या रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले.
हेटमेयरने 78 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. हे त्याचे वनडेतील तिसरे शतक आहे.
हेटमेयर बाद झाल्यानंतर अॅशले नर्स(2) आणि जेसन होल्डरही(38) नियमित कालांतराने बाद झाले. पण अखेर देवेंद्र बिशू (22) आणि केमार रोचने (26) विंडिजला 322 धावांचा टप्पा गाठून दिला.
भारताकडून युजवेंद्र चहल(3/41), खलील अहमद(1/64), मोहम्मद शमी (2/81) आणि रविंद्र जडेजाने (2/66) विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–२००वा वनडे सामना खेळणाऱ्या या दिग्गज फलंदाजाच्या नावावर झाला नकोसा विक्रम
–२०१९ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरचा विकेटकिपर खेळणार मुंबईकडून
–एमएस धोनीला हा ‘कुल’ विक्रम करत सचिन, द्रविडच्या यादीत सामील होण्याची संधी
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..