गाबा कसोटीत भारताला विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 89 धावांवर घोषित केला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 185 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी 275 धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने 3, तर मोहम्मद सिराज आणि आकाशदीपने प्रत्येकी 2 बळी घेतले. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघ आपल्या स्कोअरमध्ये केवळ 8 धावा जोडू शकला. ज्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला.
पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 185 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा धक्का दिला. उस्मान ख्वाजा 8 तर मार्नस लॅबुशेन केवळ 1 धावा करून बाद झाला. बुमराहनंतर आकाशदीपनेही कांगारू फलंदाजांना त्रास दिला. त्याने नॅथन मॅकस्विनी आणि मिचेल मार्शला तंबूत पाठवले. काही वेळाने मोहम्मद सिराजनेही वाहत्या गंगेत आपले हात धुऊन घेतले कारण त्याने प्रथम स्टीव्ह स्मिथ आणि नंतर ट्रॅव्हिस हेडला 17 धावांवर बाद केले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया गाब्बा मैदानावर शेवटचे आमनेसामने आले होते. तेव्हा टीम इंडियाने 3 गडी राखून रोमहर्षक विजय नोंदवून इतिहास रचला होता. रिषभ पंतची ती 89 धावांची खेळी आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात ताजी असेल. त्यावेळी 28 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा गाब्बा मैदानावर कोणत्याही संघाकडून पराभव झाला होता. आता भारतीय संघासमोर 275 धावांचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठता येईल. पण चौथ्या डावात येथे फलंदाजी करणे सोपे नसेल.
पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया 1-1 ने बरोबरीत आहेत. जर गाबा कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली तर दोन्ही संघांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये प्रत्येकी 4 गुण मिळतील. त्यामुळे अंतिम शर्यत आणखीनच रोमांचक होईल.
हेही वाचा-
कसोटीच्या चौथ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या (टाॅप-5) संघ
जसप्रीत बुमराहने मोडला कपिल देवचा वर्ल्ड रेकाॅर्ड, ऑस्ट्रेलियात बनवला हा भीमपराक्रम
स्मृती मानधनाने रचला इतिहास, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू