भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आज (रविवार, २१ जून) भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांची निवड करण्यात आली असून त्यांचे संघपुनरागमन झाले आहे, मात्र अनेक खेळाडूंना वगळण्यात आले आहे. तसेच रोहित शर्माचाही संघात समावेश केला असल्याने जानेवारीनंतर प्रथमच विराट आणि रोहित एकाच संघाचा भाग आहेत.
विराटला आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यावेळी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, यामुळे आवश्यक फिटनेस मंजुरीनंतरच तो या मालिकेसाठी उपलब्ध होईल, असे बीसीसीआयने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतकी खेळी करणारा यशस्वी जायस्वाल याला इंग्लंड दौऱ्यासाठी दुर्लक्षित केले आहे. तसेच प्रिन्स यादव यालाही इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळालेले नाही. विशेष बाब म्हणजे, विराट आणि बुमराहबरोबर अक्षर पटेल याचेही पुनरागमन झाले आहे. हार्दिक पंड्या अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याने नितीश कुमार रेड्डी सध्या भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात सामील झाला आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणारा गुरनूर ब्रार याचीही इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच याच मालिकेत खेळलेल्या प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांनाही संघात कायम ठेवले आहे. या संघनिवडीतील आश्चर्याची बाब म्हणजे मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळालेले नाही. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांसाठी ‘वर्कलोड मॅनेजमेंट’चा (कामाचा ताण व्यवस्थापित करण्याचा) भाग म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली होती, मात्र आता वनडे संघातही त्याचा समावेश नाही.
दुसरीकडे बुमराहची संघात निवड झाली असून तो आयपीएल २०२६ हंगामानंतर आपल्या पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय मालिकेसाठी पुनरागमन करणार आहे. तसेच २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर तो भारताच्या वनडे संघात परतला आहे. त्याच्या संघात येण्याने भारताच्या वेगवान गोलंदाजीला आणखी वेग मिळेल.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली * , श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर) इशान किशन (विकेटकीपर) वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार.
(विराट कोहली आवश्यक फिटनेस मंजुरीनंतरच या मालिकेसाठी उपलब्ध होईल)
या मालिकेतील पहिला वनडे सामना १४ जुलैला एजबस्टन येथे, दुसरा सामना १६ जुलैला सोफिया गार्डन आणि तिसरा सामना १९ जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.






