आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (सोमवार, २३ मार्च) फेब्रुवारी महिन्याच्या प्लेयर ऑफ द मंथ जाहीर केला आहे. महिला आणि पुरुषांच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तानचे वर्चस्व दिसले आहे. महिलांमध्ये भारताच्या आणि पुरुषांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे. टी२० विश्वचषक २०२६ मध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान याला हा पुरस्कार मिळाला आहे.
महिलांमध्ये भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीने बाजी मारली आहे. तिने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विजयी टी२० मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. तीन सामन्यांच्या त्या मालिकेत अरुंधतीने १०.८७ च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या. यावेळी तिचा इकॉनॉमी रेट ७.२५ राहिला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच टी२० सामन्यात अरुधंतीने २२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तो सामना भारताने २१ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. तसेच त्यामध्ये अरुधंती प्लेयर ऑफ द मॅच ठरली. पुढील दोन सामन्यांमध्येही तिने ३० धावा देत २ विकेट्स आणि ३५ धावा देत २ विकेट्स अशी कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीमुळे भारताने २०१६ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टी२० मालिका (२-१) जिंकण्याची कामगिरी केली होती.
साहिबजादाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळेच त्याने इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स आणि यूएसएचा वेगवान गोलंदाज शेडली वॅन शाल्कविक यांना मागे टाकत आयसीसीचा ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकला.
साहिबजादाने ७ सामन्यात ३८३ धावा करत एकाच टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला. यावेळी त्याने २ शतकेही झळकावली होती. त्यामुळे तो एकाच टी२० आयसीसी स्पर्धेत दोन शतके करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी करताच तो आयसीसी टी२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आला. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी ठरली.






