एमएस धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी इंस्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. एमएस धोनीने २००४ मध्ये पदार्पण केले आणि २०२० मध्ये तो निवृत्त झाले. एकूणच तो जवळपास १६ वर्ष भारतीय संघाचा सदस्य राहिला.
एमएस धोनीने २४ डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. खरं तर तो त्या सामन्यात फ्लॉप झाला होता. पहिल्याच चेंडूवर तो धावबाद होऊन तंबूत परतला. परंतु तो सामना भारतीय संघाने ११ धावांनी जिंकला होता.
एमएस धोनीने पदार्पण केले तेव्हा सौरव गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. त्या संघात अनेक दिग्गज खेळाडू होते. या लेखामध्ये एमएस धोनीच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताच्या अंतिम ११ संघात असणाऱ्या खेळाडूंबद्दल व त्यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेणार आहोत आणि आता ते कुठे आहेत हे ही पाहूया.
एमएस धोनीच्या पदार्पण सामन्यात अंतिम अकरामधील सर्व भारतीय खेळाडूंनी त्या सामन्यात केलेली कामगिरी आणि ते खेळाडू आता कोठे आहेत?
सौरव गांगुली (Sourav Ganguly)
सौरव गांगुली त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता पण त्या सामन्यात तो खाते न उघडताच माघारी परतला होता. सध्या सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष आहे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्या सामन्यात ३२ चेंडूंत १९ धावा केल्या होत्या आणि संघाच्या ३७ धावा असताना तो बाद झाला होता. सचिन २०१३ मध्ये निवृत्त झाला आहे. सध्या तो आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाजी मार्गदर्शक आहे.
युवराज सिंग (Yuvraj Singh)
युवराज सिंगने त्या सामन्यात ३३ चेंडूत २१ धावा केल्या आणि तो संघाच्या ४५ धावा असताना बाद झाला होता. युवराज सिंगने २०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि सध्या तो जगभरातील टी-२० स्पर्धांमध्ये खेळत आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid)
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात राहुल द्रविडने भारतीय संघाचा डाव सावरला आणि अर्धशतकीय खेळी साकारली. त्याने ८० चेंडूत ५३ धावा केल्या होत्या. द्रविड निवृत्तीनंतर भारताच्या युवा संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आणि आता तो बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे.
मोहम्मद कैफ (Mohammed Kaif)
या सामन्यात मोहम्मद कैफने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. धोनी आणि कैफ यांच्यात धावा घेताना समन्वय न राखला गेल्याने धोनी शून्यावर बाद झाला होती. कैफच्या या खेळीने भारताला मोठ्या धावसंख्येवर नेले होते. सध्या तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे.
श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram)
या सामन्यात श्रीधरन श्रीरामला फक्त ३ धावा करता आल्या परंतु गोलंदाजीत त्याने ३ बळी घेतले. सध्या तो आयपीएलमध्ये आरसीबीचा फलंदाजी व फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
अजित आगरकर (Ajit Agarkar)
दिग्गज अष्टपैलू अजित आगरकरने या सामन्यात २४ चेंडूत २५ धावा केल्या आणि या सामन्यात २ बळी घेतले. आगरकर सध्या क्रिकेट तज्ज्ञ म्हणून बर्याच कार्यक्रमामध्ये जातो.
इरफान पठाण (Irfan Pathan)
माजी अष्टपैलू इरफान पठाणने या सामन्यात फलंदाजीत ११ चेंडूंत २१ धावा करून गोलंदाजीत १ गडी बाद केला होता. त्याने याचवर्षी सुरुवातीला निवृत्ती घेतली. आता पठाण समालोचक म्हणून कार्यरत आहे.
जोगिंदर शर्मा (Joginder Sharma)
याच सामन्यातून धोनीबरोबर जोगिंदर शर्मानेही पदार्पण केले होते. त्याने या सामन्यात ५ धावा केल्या आणि १ बळी घेतला होता. सेवानिवृत्तीनंतर तो पोलिस सेवेत रुजू झाला आहे.
हरभजन सिंग (Harbhajan Singh)
हरभजनला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तसेच त्याला गोलंदाजीतही यश आले नाही. हरभजन सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य आहे. तसेच अनेकदा तो समालोचन करतानाही दिसतो. असे असले तरी अजून त्याने निवृत्तीची घोषणा केलेली नाही.