आशिया चषकातील चौथा सामना भारत विरुद्ध हाँगकाँग यांच्या दरम्यान दुबई येथे खेळला जातोय. या सामन्यात हाँगकाँग संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागले. प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाने ही संधी साधत निर्धारित 20 षटकात 192 धावा धावफलकावर लावल्या. अनुभवी फलंदाज विराट कोहली व सूर्यकुमार यादवने झळकावलेले अर्धशतक हे भारतीय डावाचे वैशिष्ट्य राहिले.
नाणेफेक गमावून फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल यांनी चांगली सुरुवात दिली. त्यांनी 4.5 षटकात 38 धावांची भागीदारी केली. रोहित 21 धावा करून माघारी परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने काहीसे आक्रमक रूप धारण केले. मात्र, राहुल हा 39 चेंडूवर 36 धावा करून तंबूत परतला. विराट कोहली व चौथ्या क्रमांकावरील सूर्यकुमार यादव यांनी यानंतर अखेरच्या सहा षटकात वेगवान फलंदाजी केली. यादरम्यान विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या टी20 कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक ठरले.
विराटच्या अर्धशतकानंतर सूर्यकुमार यादव यानेदेखील आपली खेळी आणखी पुढे नेली. त्याने अवघ्या 22 चेंडूत 50 धावांची गवसणी घातली.
विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 44 चेंडूवर 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने सूर्यकुमारने आणखी वादळी खेळी करत 26 चेंडूत 6 चौकार व 6 षटकार ठोकत नाबाद 68 धावा चोपल्या.