भारतीय संघाने इंग्लंडला मायदेशातील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पराभूत करत मालिकेत ३-१ अशा फरकाने विजय मिळवला. यासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. १८ जूनपासून लॉर्डसच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात भारतीय संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करेल.
भारतीय संघाने आयसीसीच्या जागतिक स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात अंतिम फेरी गाठण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी भारताने टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच हंगामात अंतिम फेरी गाठली होती, तसेच विजेतेपद देखील पटकावले होते. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्याही पहिल्याच हंगामात भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याच निमित्ताने या अंतिम फेरीविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.
पहिल्यांदाच खेळणार त्रयस्थ ठिकाणी
भारतीय संघ १९३२ सालापासून कसोटी सामने खेळत आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच लॉर्डस वरील सामन्यात भारत त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ मात्र यापूर्वी त्रयस्थ ठिकाणी ६ सामने खेळला आहे. हे सहाही सामने न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध खेळले असून हे सामने अबूधाबी, दुबई आणि शारजा येथे खेळल्या गेले आहेत. त्यामुळे त्रयस्थ ठिकाणी खेळण्याच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो.
इंग्लंडमध्ये खेळण्याचा भारताला अनुभव अधिक
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी इंग्लंडमध्ये होणार आहे. इंग्लंडमध्ये भारताने ६२ कसोटी सामने खेळले असून त्यातील ७ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने ५४ सामने खेळले आहेत, ज्यातील ५ कसोटी सामन्यात त्यांना विजय प्राप्त झाला आहे. त्यामुळे दोन्हीही संघांचे रेकॉर्ड साधारण सारखेच आहेत. लॉर्ड्सबाबत बोलायचे झाल्यास भारताने येथे १८ पैकी दोन सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने १७ पैकी केवळ एक सामना जिंकला आहे.
लॉर्ड्सचे मैदान वेगवान गोलंदाजांना अनुकूल
लॉर्ड्सच्या मैदानाची खेळपट्टी पारंपारिकरित्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. भारताने या मैदानावर शेवटचा सामना ऑगस्ट २०१८ मध्ये खेळला होता, ज्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि १५९ धावांनी हरवले होते. यात भारताच्या सगळ्या विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या. त्यामुळे येत्या अंतिम सामन्यातही असेच चित्र राहण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडकडे अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून टीम साउदी आणि ट्रेंट बोल्ट उपलब्ध असून भारताकडेही मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत.
महत्वाच्या बातम्या:
एबी डिविलियर्सने केले विराटचे कौतुक; म्हणाला, त्याच्या नेतृत्वाने युवा क्रिकेटपटूंना
धक्कादायक! माजी रणजीपटूला ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कर्णधारांच्या या यादीत पटकावले दुसरे स्थान