---Advertisement---

महिला टी२० विश्वचषक फायनल: ऑस्ट्रेलियाचे भारताला १८५ धावांचे आव्हान

On: रविवार, मार्च 8, 2020 2:04 PM
---Advertisement---

मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या आहेत आणि भारताला विजयासाठी २० षटकात १८५ धावांचे आव्हान दिले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रलियाकडून एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी सलामीला फलंदाजीला येत तुफानी फटकेबाजी केली. या दोघींनीही सलामीला ११.४ षटकातच ११५ धावांची भागीदारी रचली. पण अखेर राधा यादवने हेलीला ७५ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. हिलीने ३९ चेंडूत ७५ धावा केल्या. या खेळीत तिने ७ चौकार आणि ५ षटकार मारले.

तसेच मूनी या सामन्यात नाबाद राहिली. तिने ५४ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ७८ धावांची खेळी केली. हिली आणि मूनी व्यतिरिक्त मात्र ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.

हिली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा धावांच्या गतीला लगाम लागला. १७ व्या षटकात दिप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग आणि एश्ले गार्डनरला बाद करत ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. तिने या षटकात टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर लेनिंगने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तिचा झेल स्क्वेअर लेगला असणाऱ्या शिखा पांडेने घेतला.

त्यापाठोपाठ गार्डनरला या षटकाच्या पाचव्या चेंडूवर यष्टीरक्षक तानिया भाटियाने तिला यष्टीचीत केले. लेनिंगने १६ धावा केल्या. तर गार्डनर २ धावा केल्या. तसेच १९ व्या षटकात पूनम यादवने रेचेल हाइन्सला ४ धावांवर त्रिफळाचीत केले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाने ८ धावा केल्या आणि भारतासमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---