भारताचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंग याने भारताच्या २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक विजयांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली होती. यातील २००७मध्ये त्याने एकाच षटकात मारलेले सहा षटकार तर चाहते कधीही विसरणार नाहीत. मात्र त्याने घेतलेल्या तडका-फडकी निवृत्तीने चाहत्यांना दु:ख झाले होते. त्याने २०१९चा वनडे विश्वचषकाच्या मध्यातच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या निवृत्तीमागचे कारण आता त्याने स्पष्ट केले आहे.
युवराजला वाटत होते की त्याच्या खेळाचा आणि त्याचा आता कोणीही सन्मान करत नाहीये. यामुळेच त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.
युवराजला २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघातून बाहेर केले गेले. त्याने त्याच्या निवृत्तीमागचे कारण भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्जाच्या ‘सर्विंग इट अप विद सानिया’ या युट्युब पॉटकास्टमध्ये सांगितले आहे. त्यामध्ये सानियाने त्याला ‘तो फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा त्यांच्या मनात काय सुरू होते?’ असे विचारले.
सानियाच्या त्या प्रश्नावर युवराज म्हणाला, “खर सांगू तर मी माझ्या गेमचा पूर्णपणे आनंद घेत नव्हतो. तेव्हा मी मलाच प्रश्न विचारला की मी का खेळत आहे. तेव्हा मला वाटत होते मला कोणाचीही साथ मिळत नाहीये किंवा कोणीही माझा सन्मान करत नाहीये. तेव्हा मला वाटले मी मागे राहतोय. या खेळाने मला खूप काही दिले. जे काम आपल्याला आनंद देत नसेल त्याला का जोडून राहावे. मला खेळण्याची गरजच का आहे. यातून मी काय हेतू साध्य करणार होतो. तसेच मी शारीरिक आणि मानसिकरित्याही थकलो होतो. जेव्हा मी थांबलो तेव्हा मला पूर्वीसारखे वाटू लागले.”
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा युवराजचा विक्रम अबाधित आहे. त्याने २००७मध्ये इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या. त्याचा हा विक्रम त्याचाच शिष्य आणि भारताचा सध्याचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा तोडू शकतो अशी दाट शक्यता आहे. कारण नुकतेच त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यात १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.






