---Advertisement---

टी20 वर्ल्ड कपमध्ये नाही मिळाली संधी, आता कॅप्टन शुबमन गिलने सांगितले त्याचे सर्वात मोठे ध्येय

On: सोमवार, मार्च 16, 2026 6:11 PM
---Advertisement---

भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल याला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. खराब फॉर्ममुळे त्याला टी२० विश्वचषकाच्या संघातून वगळले गेले होते. आता त्याने त्याचे लक्ष २०२७ चे वनडे विश्वचषक जिंकण्यावर केंद्रित केले आहे. २०२३ मध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र घरच्या मैदानावर त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला होता.

रविवारी (१५ मार्च) दिल्लीमध्ये बीसीसीआय नमन पुरस्कार सोहळा पार पडला. तेव्हा गिलला माध्यामांनी पुढील वनडे विश्वचषकाबद्द्ल काय विचार आहे, असे विचारले होते. त्यावर तो म्हणाला, “”देशासाठी कोणत्याही प्रकारात विश्वचषक जिंकणे हेच अंतिम ध्येय आहे. त्यामुळे साहजिकच, ही अशी एक गोष्ट आहे जी कधीकधी माझ्या मनात येते. गेल्या वेळी जेव्हा आम्ही भारतात अंतिम फेरीत होतो तेव्हा वाटले आम्ही विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ होतो. आता दक्षिण आफ्रिकेत तो जिंकण्याची संधी आमच्याकडे आहे, जी आमच्यासाठी एक उत्तम संधी असेल.”

गिलने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत त्याचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, “२०१३ मध्ये लहानपणी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहणे निश्चितच खास होते. माझे सर्व आदर्श खेळाडू विराट भाई, रोहित भाई, ऐश भाई आणि माही भाई यांना पडद्यावर पाहणे आणि त्यांना इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकताना पाहणे ही एक खास अनुभूती होती.”

कसोटी आणि वनडेमध्ये गिल भारताचा कर्णधार असून त्याबद्दलच्या जबाबदारीबाबतही त्याने त्याचे मत मांडले आहे. तो म्हणाला, “खरं बोलू तर म्हणणे सोपे आणि करणे कठीण आहे, मात्र आपण त्यावर लक्ष दिले तर सर्व काही सोपे होते.”

“माझे मुख्य काम एक खेळाडू आणि एक फलंदाज म्हणून धावा करणे आहे. मी धावा करत असू तर सर्व ठीक होते, त्यामुळे माझे लक्ष सध्या त्यावरच आहे. संघासाठी कसे योगदान देऊ शकतो याचा विचार सुरू असतो. खेळ हा जिंकण्यासाठीच असतो, त्यामुळे संघाला कसा विजय मिळवून देता येईल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल,” असेही गिलने पुढे सांगितले आहे.

आयसीसी वनडे विश्वचषक २०२७ च्या स्पर्धेचे सामने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळले जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---